लोहाऱ्यातील तरुण शेतकरी टरबुजाद्वारे उत्पादन घेऊन कमावतोय लाखो रुपये

0
2

साईमत, लोहारा, ता.पाचोरा : वार्ताहर

येथील तरुण आदर्श शेतकरी ज्ञानेश्‍वर दौलत माळी (वय ४३) यांनी दहावीचे शिक्षण घेतले. त्यानंतर नोकरीच्या मागे न धावता आई-वडिलांनी केलेली शेतीच आपण पुढे नेऊन त्याच्यातूनच आपली वेगळी ओळख निर्माण करु शकतो. असा त्यांनी निर्धार केला होता. त्यामुळे त्यांची आज आदर्श शेतकरी म्हणून परिसरात ओळख आहे. आता उन्हाळ्यात तब्बल १२ एकर क्षेत्रात टरबुजाचे उत्पादन ते घेत आहेत. त्या माध्यमातून ते लाखो रुपयेही कमावत आहेत. आता सध्या टरबुजाचे भाव अकरा रुपये किलो आहेत. त्यांचे शेतीवरचे नितांत प्रेम पाहून आणि विक्रमी टमाट्याचे पीक घेत असल्याने त्यांना लोक प्रेमाने ‘टमाटे नाना’ असेही म्हणतात, असे ते आवर्जुन सांगतात.

उन्हाळ्यात यशस्वी टरबुजाची शेती करून त्या माध्यमातून तरुणांसमोर एक आदर्श ते निर्माण करीत आहेत. म्हणून लोहारा परिसरात असलेले आदर्श शेतकरी तथा कृषीरत्न विश्‍वासराव पाटील, सुभाष पाटील तसेच ज्ञानेश्‍वर माळी यांचे गुरुवर्य पटेल, श्री.सुर्वे यांनी शेतामध्ये येऊन उत्कृष्ट शेती करीत असल्याने त्यांची पाठ थोपटली. शेतीमधील पीएचडी आपण करीत असल्याचे सांगितले.

कृषीरत्न विश्‍वासराव पाटील यांनी त्यांच्याकडून करीत असलेल्या शेतीबद्दल माहिती जाणून घेतली. शेती विषयक प्रवास त्यांनी प्रश्‍न उत्तरे कार्यक्रमात घेऊन केला. ज्ञानेश्‍वर माळी या शेतकऱ्याने एकाचवेळी तिहेरी पीक आपण घेऊ शकतो. म्हणून शेतात मोसंबी, पपई, टरबूज अशी लागवड केलेली आहे. शेती करीत असताना शेतात लिक राहू न देणे म्हणजे पाण्याची बचत होईल, असे ते सांगतात. त्यांच्या विहिरीवर त्यांनी सौर ऊर्जेवरील सोलर पंप बसवून घेतला आहे. टरबुजांच्या संरक्षणासाठी झटका मशीन लावलेला असून त्याने पिकाचे संरक्षण होते, असे ते सांगतात.

टरबुजाचे चांगले उत्पादन घ्यायचे असल्यास आपल्या शेतात मधमाशी असणे फार गरजेचे आहे. फुलावरील परागकण स्थलांतरित होऊन फळ तयार होण्यास लवकर मदत होते, असे ते सांगतात. आपल्या लोहारा गावातील शेतकरी चांगले उत्पन्न घेत असल्याने विश्‍वासराव पाटील यांनी समाधान व्यक्त केले. कृषी खात्यामार्फत काही योजना शेतकऱ्यांनी राबवून घेत शेतीचा विकास करावा, असे सांगितले. आदर्श शेतकरी ज्ञानेश्‍वर माळी यांनी लागवड केलेल्या टरबूजाचा आस्वाद सर्वांना दिला. यावेळी विश्‍वासराव पाटील, सुभाष पाटील, गुरुवर्य पटेल, श्री.सुर्वे, उमेश देशमुख, पत्रकार गजानन क्षीरसागर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here