वीज महावितरणच्या गलथान कारभारामुळे गहू आगीत खाक

0
18

साईमत, फैजपूर : प्रतिनिधी

पिंपरूड शिवारातील आकाश लक्ष हॉटेल समोरील चावदस सराफ यांच्या शेतातील बटाईने लुमदास सराफ यांनी केलेल्या कापणीस आलेला गहू व कडबा चाऱ्याचा गुड शेत बांधावरील महावितरणच्या लोंबकळत असलेल्या तारा शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाला आहे. त्यामुळे लाखोंचे नुकसान होऊन शेतकऱ्यांचा मदतीसाठी आक्रोश होत आहे. घटनास्थळी गेल्या चार-पाच दिवसापासूनच लोंबलेल्या विजेच्या तारांमुळे मोठ्या प्रमाणात शॉटसर्किट होत असल्याची तक्रार शेतकऱ्याने महावितरणच्या कार्यालयामध्ये देऊनही ट्री कटिंगकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे अप्रिय घटना घडल्याचे प्रत्यक्षदर्शनी सांगितलेे.

याप्रसंगी पिंपरुडचे पोलीस पाटील हरीश चौधरी, तुषार चौधरी, माजी पोलीस पाटील ज्ञानदेव चौधरी, माजी सरपंच डोंगर चौधरी, लीलाधर चौधरी, ललित चौधरी यांच्यासह येथील ग्रामस्थांनी आग विझविण्याकामी सहकार्य केले. मात्र, वारा मोठ्या प्रमाणात असल्याने आगीची झळ शेजारी उभ्या असलेल्या ललित चौधरी यांच्या ऊसालाही मोठ्या प्रमाणात बसल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. आगीची बातमी कळताच फैजपूर महसूलचे मंडळाधिकारी हबीब तडवी यांच्या मार्गदर्शनाखाली फैजपूरचे तलाठी तेजस पाटील, न्हावीचे तलाठी ए.एस.महाजन, पिंपरुडचे तलाठी रेखा एस.जोरवार, बी.टी.तायडे यांच्यासह महसूलच्या टीमने घटनास्थळी तात्काळ येऊन नुकसानीचा पंचनामा केला. पंचनाम्यात गहू कडबा चाऱ्याचे एक लाख ९८ हजार तर ऊसाचे तीन लाखापर्यंतचे नुकसान झाल्याची नोंद केली आहे.

घटनास्थळी वीज महावितरणचे आमोदा प्रभारी उप अभियंता संदीप पाटील, फैजपुरचे उपकार्यकारी अभियंता नितीन पाटील, वायरमन कुंदन बोरवले, मयूर नेहते, लाईनमन राकेश आढळ असे वीज महावितरणचे पथकही उपस्थित झाले होते. यावेळी महावितरण अधिकाऱ्यांशी शेतकऱ्यांचा संतप्त संवाद झाला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी जवळ असलेल्या विहिरीत आत्महत्येचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांना उपस्थितांनी धीर देऊन थांबविले. महावितरण अधिकाऱ्यांच्याशी पुनश्‍च संवाद साधून तात्काळ नुकसान भरपाई देण्याचे आश्‍वासित केले.

अनेकांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

यावेळी माजी नगराध्यक्ष निलेश राणे, जि.प.चे माजी सदस्य भरत महाजन, अजय बढे, माजी नगरसेवक अमोल निंबाळे, शेख कुर्बान, अनंता नेहेते, संजय सराफ, विजय सराफ, चावदस सराफ, रमेश अठवाणी, सुधाकर पाटील, चंद्रकांत भिरुड, निलेश कोल्हे, कृणाल कोल्हे आदींनी घटनास्थळी तात्काळ भेट देऊन शेतकऱ्याशी संवाद साधला. आग विझविण्यासाठी फैजपूर नगरपालिका आणि सावदा नगरपालिकेचे अग्नीक्षमन बंब बोलविण्यात आले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here