सीईओ करिश्मा नायर यांची मोठी घोषणा; जुलै महिन्यात जिल्हाभर राबवणार ‘विशेष मोहीम’
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
प्रधानमंत्री आवास योजनेतील घरकुल लाभार्थ्यांना हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले आहे. घरकुलासाठी मंजूर झालेल्या जागांवर तब्बल वर्षानुवर्षे ठाण मांडून बसलेल्या अतिक्रमकांना हटवण्यासाठी जुलै महिन्यात संपूर्ण जिल्ह्यात ‘विशेष अतिक्रमण निर्मूलन मोहीम’ राबवली जाणार आहे. स्थानिक पोलिसांच्या बंदोबस्तात ही अतिक्रमणे थेट जमीनदोस्त केली जातील, अशी कडक चेतावणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) करिश्मा नायर यांनी दिली आहे. तसेच ज्या लाभार्थ्यांच्या जागांवर अशी अतिक्रमणे आहेत, त्यांनी तातडीने प्रशासनाशी संपर्क साधण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
’ग्राउंड झिरो’वरील पाहणीनंतर प्रशासनाचा मोठा निर्णय
प्रधानमंत्री आवास योजना (टप्पा-१ आणि २) अंतर्गत मंजूर असूनही जिल्ह्यातील शेकडो घरकुले अद्यापही अपूर्ण अवस्थेत आहेत. या रखडलेल्या घरकुलांमागील मूळ कारण शोधण्यासाठी सीईओ करिश्मा नायर या स्वतः ग्रामीण भागात जाऊन ‘ग्राउंड रिपोर्ट’ घेत आहेत. या प्रत्यक्ष पाहणीदरम्यान अनेक गोरगरीब लाभार्थ्यांच्या हक्काच्या जागेवर इतरांनी बेकायदेशीरपणे अतिक्रमणे केल्यामुळेच बांधकामे ठप्प झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यावर तात्काळ उपाय म्हणून प्रशासनाने थेट जुलै महिन्यातच ‘विशेष मोहीम’ हाती घेण्याचे निश्चित केले आहे.
पोलिसांच्या मदतीने ‘क्लीन स्वीप’
अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवर वाद असल्याने अतिक्रमणे हटवण्यात अडचणी येत होत्या. मात्र, आता जिल्हा परिषद प्रशासन यासाठी थेट पोलीस दलाची मदत घेणार आहे. स्थानिक पोलीस प्रशासनाच्या समन्वयाने ही मोहीम राबवली जाणार असून, अतिक्रमणे हटवून तो भूखंड तात्काळ मूळ लाभार्थ्यांच्या ताब्यात दिला जाईल. यामुळे घरकुलांचा मार्ग पूर्णपणे मोकळा होणार आहे.
“ज्या लाभार्थ्यांच्या घरकुलाच्या जागेवर कोणी अतिक्रमण केले असेल, त्यांनी अजिबात न घाबरता आपल्या ग्रामसेवकाशी किंवा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांशी (BDO) तातडीने संपर्क साधावा. प्रशासनाशी समन्वय ठेवून या सुवर्णसंधीचा फायदा घ्यावा आणि जागा ताब्यात मिळताच घरकुलाचे बांधकाम तातडीने पूर्ण करावे. पात्र लाभार्थ्यांना त्यांचे पक्के घर मिळवून देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे.”
— करिश्मा नायर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. जळगाव
