विना परवाना व विना बिल ‘क्रॉप बूस्टर’चे वितरण; पाच अधिकाऱ्यांच्या पथकाची धडक कारवाई, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
साईमत- जळगाव – प्रतिनिधी|
कृषी मित्र’ पद भरतीच्या नावाखाली बेरोजगार युवकांची दिशाभूल करून परीक्षा शुल्क उकळणे आणि विना परवाना खत सदृश्य जैव उत्पादनांचे वितरण केल्याचा एक अत्यंत गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला आहे. कृषी विभागाच्या जिल्हास्तरीय भरारी पथकाने जळगावातील एका महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर थेट धाड टाकून तब्बल २७३ जैव उत्पादनांची पाकिटे जप्त केली आहेत.
या प्रकरणी संबंधित संस्था, उत्पादक कंपनी आणि जिल्हा समन्वयकाविरुद्ध खत नियंत्रण आदेश, अत्यावश्यक वस्तू अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेअंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसांत अधिकृत तक्रार देण्यात आली आहे.
१११ उमेदवार देत होते परीक्षा; २५० रुपयांची वसुली
नाशिक येथील विभागीय कृषी सहसंचालकांच्या निर्देशानुसार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरबान तडवी यांच्या नेतृत्वाखाली कृषी विकास अधिकारी पद्मनाभ म्हस्के, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे आणि कृषी अधिकारी लक्ष्मण पाटील यांच्या पथकाने या परीक्षा केंद्राची अचानक पाहणी केली.
अचानक केलेल्या पाहणीत केंद्रावर १११ उमेदवार परीक्षा देत असल्याचे आढळून आले.
प्रत्येक उमेदवाराकडून ऑनलाइन पद्धतीने २५० रुपये परीक्षा शुल्क आकारण्यात आले होते.
परीक्षा केंद्रावर उमेदवारांना मोफत वाटण्यासाठी ठेवलेले ‘क्रॉप बूस्टर’ (पोटॅशियम ह्युमेट ६५%) नावाचे २५० ग्रॅम वजनाचे २७३ जैव उत्पादनांचे पाकिटे (एकूण ७ बॉक्स) जप्त करण्यात आले.
प्राथमिक तपासणीत संबंधित उत्पादक कंपनीकडे कृषी विभागाचा कोणताही वैध उत्पादक परवाना नसल्याचे स्पष्ट झाले आहे. कृषी विभागाने खत नियंत्रण आदेश (FCO-1985) नुसार या उत्पादनाचे नमुने घेऊन ते शासकीय प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठवले आहेत.
‘या’ कंपन्यांवर आणि जिल्हा समन्वयकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी
प्राथमिक चौकशीत खालील संस्थांनी संगनमत करून विना परवाना जैव उत्पादकांची निर्मिती, विना बिल वाहतूक आणि वितरण केल्याचा आरोप कृषी विभागाने केला आहे:
खासगी महात्मा फुले कृषी विकास केंद्र (छत्रपती संभाजीनगर)
२. हिंदुस्तान ॲग-टेक बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड (जालना)
३. राजकुमार लक्ष्मण जैन (जिल्हा समन्वयक)
बनावट भरती प्रक्रियेच्या माध्यमातून उमेदवारांकडून परीक्षा शुल्क गोळा करून शासनासह बेरोजगार युवकांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी खत नियंत्रण आदेश, १९८५, अत्यावश्यक वस्तू अधिनियम, १९५५ तसेच भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम ३१८(४) अंतर्गत गुन्हा नोंदविण्याची मागणी जळगाव पोलिसांकडे करण्यात आली आहे.
इतर ५ जिल्ह्यांतही रॅकेट सक्रिय; तपास सुरू
कृषी विभागाच्या या धडक कारवाईमुळे बनावट भरतीच्या नावाखाली राज्याभरात सुरू असलेल्या मोठ्या गैरप्रकाराचा पर्दाफाश झाला आहे. जळगाव व्यतिरिक्त बुलढाणा, वाशीम, छत्रपती संभाजीनगर आणि धुळे या जिल्ह्यांमध्येही संबंधितांविरुद्ध अशाच स्वरूपाच्या अधिकृत फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. या संपूर्ण रॅकेटचा तपास आता वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये अत्यंत वेगाने सुरू आहे.
कृषी विभागाच्या या कारवाईमुळे राज्यातील बेरोजगार तरुणांची फसवणूक करणाऱ्या टोळीला मोठा आळा बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
