पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात
साईमत /पाळधी(धरणगाव)/ प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ रविवारी (दि. २८ जून) पाळधी येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला. पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते एका चिमुकल्या बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजून या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिष्मा नायर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी पोलिओ निर्मूलनासाठी शासन सातत्याने राबवत असलेल्या मोहिमांमध्ये समाजाच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “पाच वर्षांखालील प्रत्येक बालकाला पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब मिळणे अत्यावश्यक आहे. कोणतेही मूल लसीकरणापासून वंचित राहू नये, ही केवळ आरोग्य विभागाची नाही तर पालक आणि समाजाचीही सामूहिक जबाबदारी आहे.” पोलिओमुक्त भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी नागरिकांनी या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले.
या कार्यक्रमास जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. ऋषिकेश झवर, डॉ. सायमा खान, लोकनियुक्त सरपंच बापूसाहेब विजय पाटील, ग्रामविकास अधिकारी दीपक पाठक, आरोग्य सहाय्यक अनिल महाजन व हितेश पाटील, आरोग्य सेवक अतुल नन्नवरे व प्रदीप अडकमोल, गटप्रवर्तक संगीता पाटील, चेतना पाटील तसेच आशा सेविका आणि आरोग्य विभागातील अधिकारी-कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राष्ट्रीय पल्स पोलिओ मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांवर पाच वर्षांखालील बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचे दोन थेंब पाजण्यात आले. जिल्ह्यातील प्रत्येक बालकापर्यंत लसीकरण पोहोचावे आणि एकही बालक वंचित राहू नये, यासाठी आरोग्य विभागाने व्यापक नियोजन केले असून नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
