शिडी लावून सीलबंद घरात घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांच्या कारवाईत दोघे ताब्यात
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केलेल्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या सीलबंद निवासस्थानी घुसखोरी झाल्याचा अत्यंत गंभीर प्रकार जळगावात उघडकीस आला असून संपूर्ण प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (वर्ग-१) किरण पुरुषोत्तम चौधरी यांच्या जळगावातील सीलबंद घरात कुलूप तोडून प्रवेश करणाऱ्या दोन संशयितांना जिल्हापेठ पोलिसांनी घटनास्थळीच पकडले आहे.ही घटना गणेश कॉलनी परिसरातील साईप्रभा आर्केड येथे शनिवारी रात्री उशिरा घडली.
अकोला येथील एसीबी पथकाने काही दिवसांपूर्वी किरण चौधरी यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई केली होती. त्यानंतर त्यांच्या जळगावातील निवासस्थानी तपासाशी संबंधित महत्त्वाची प्रक्रिया सुरू असल्याने हे घर एसीबीकडून सीलबंद करून सुरक्षित ठेवण्यात आले होते.
शनिवारी रात्री या बंद घरातून संशयास्पद हालचाली आणि आवाज ऐकू आल्याचे शेजाऱ्यांच्या लक्षात आले. त्यांनी तातडीने याबाबत एसीबी आणि पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी परिसराची तपासणी केली असता घराच्या मागील बाजूने शिडी लावून दोन व्यक्ती आतमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी लगेचच सापळा रचून दोघांनाही ताब्यात घेतले. प्राथमिक चौकशीत त्यांनी चॅनल गेटचे कुलूप तोडून घरात प्रवेश केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या घुसखोरीमागे चोरीचा हेतू असू शकतो, तसेच एसीबी तपासात महत्त्वाचे ठरणारे पुरावे नष्ट करण्याचा किंवा हलविण्याचा प्रयत्न झाला असावा, असा गंभीर संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे.
या प्रकरणी पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या फिर्यादीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या दोन्ही संशयितांची सध्या कसून चौकशी सुरू असून या प्रकरणामागील सूत्रधार कोण, याचा शोध पोलीस घेत आहेत.
या घटनेनंतर सीलबंद शासकीय मालमत्तेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, तपास प्रक्रियेतील गोपनीयतेबाबतही गंभीर चर्चा सुरू झाली आहे.
