साईमत न्यूज नेटवर्क –
बदलापूर : मुंबई-वडोदरा महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात आलिशान BMW कारचा अक्षरशः चक्काचूर झाला असून, दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका तरुणीला गंभीर दुखापत झाल्याने तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना रविवारी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास एरंजाड परिसरात घडली. संबंधित BMW कार टिटवाळ्याकडून बदलापूरच्या दिशेने येत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. त्यानंतर कार महामार्गावरील दुभाजकाला जोरदार धडकून अनेकवेळा पलटी झाली.
अपघाताचा जोर इतका प्रचंड होता की कारचे मोठे नुकसान झाले. वाहनाचे अवशेष आणि इतर साहित्य मोठ्या परिसरात विखुरले गेले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळाचे दृश्य अत्यंत विदारक होते.
या अपघातात एका पुरुषासह एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर कारमधील एक तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती मिळत आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर अपघाताशी संबंधित एक व्हिडिओ व्हायरल होत असून, त्यामध्ये वाहनाचा वेग अतिशय जास्त असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, या व्हिडिओची आणि त्यातील माहितीची अधिकृत पुष्टी अद्याप झालेली नाही.
घटनेची माहिती मिळताच पोलीस, आपत्कालीन सेवा आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलिसांकडून सखोल तपास करण्यात येत आहे.
