सप्तश्रृंगीदेवी दर्शना हून परतीचा प्रवास ठरला काळरात्र भरधाव कार झाडावर धडकली
साईमत/एरंडोल/ प्रतिनिधी :
सप्तशृंगी गड येथील देवीचे दर्शन आटोपून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरकडे निघालेल्या जळगाव जिल्ह्यातील एरंडोल येथील एका कुटुंबावर काळाने घाला घातला. नाशिकजवळील म्हसरूळl परिसरात कारचा भीषण अपघात होऊन ७२ वर्षीय वृद्धेचा जागीच मृत्यू झाला, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या आहेत. या दुर्घटनेमुळे संपूर्ण एरंडोल परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सूर्यवंशी आणि विश्वे कुटुंबातील एकूण ११ सदस्य (कार क्र. MH 46 AL 5126) सप्तश्रृंगी गडावर देवीदर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपल्यानंतर शनिवारी सकाळी सुमारे १० वाजता ते त्र्यंबकेश्वरच्या दिशेने प्रवास करत असताना अचानक कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगात असलेली कार रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जोरात आदळली. हा धडक इतका भीषण होता की कारच्या पुढील भागाचा पूर्णपणे चुराडा झाला.
या अपघातात कमळाबाई रामदास सूर्यवंशी (वय ७२) यांचा जागीच मृत्यू झाला. तर वैशाली उमेश धुमावकर (वय ३३) आणि शोभाबाई धोंडू विश्वे (वय ५४) या दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर नाशिकमधील स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर प्रवाशांनाही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या जखमा झाल्या आहेत.
कारमध्ये विजय रामदास सूर्यवंशी (४०), संगीता सूर्यवंशी (३२), धोंडू विश्वे (७०), उमेश कडू धुमावकर (३८), श्रद्धा सूर्यवंशी (१५), मोहित सूर्यवंशी (१३), युग दमायकर (७) आणि देवेश दमायकर (१२) यांचा समावेश होता. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन जखमींना बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
दरम्यान, या प्रकरणी नाशिक पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून रात्री उशिरापर्यंत अपघाताचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या दुर्दैवी घटनेमुळे एरंडोल परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
