मुसळधार पावसाने शेतीच्या कामांना ब्रेक शेतीची कामे ठप्प, शेतांमध्ये पाण्याचा साठा
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
जिल्ह्यात बुधवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत संततधार सुरू आहे. जळगाव शहरासह ग्रामीण भागातही पावसाचा जोर कायम राहिल्याने जनजीवनावर परिणाम झाला आहे. अमळनेर, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव आणि धरणगाव परिसरातही पावसाने चांगलाच जोर धरल्याचे चित्र आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे शेतीच्या कामांना मोठा फटका बसला आहे. खरीप हंगामातील पेरणीनंतरची कामे, आंतरमशागत तसेच इतर शेतीची कामे पावसामुळे खोळंबली आहेत. सततच्या पावसामुळे शेतकरी शेतात जाणे टाळत असून शेतीची कामे काही काळासाठी ठप्प झाली आहेत.
शहरी आणि ग्रामीण भागातील दैनंदिन व्यवहारांवरही पावसाचा परिणाम जाणवत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही भागांत चिखल निर्माण झाल्याने वाहतुकीवरही परिणाम झाला आहे.
विशेषतः पाचोरा तालुक्यातील काही भागांत झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. पिकांच्या मुळांना पाण्याचा अतिरेक झाल्यास नुकसान होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर आणखी वाढल्यास खरीप पिकांवर विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सध्या शेतकरी पावसाच्या पुढील स्थितीकडे लक्ष ठेवून आहेत. पावसाची संततधार अशीच सुरू राहिल्यास पिकांच्या नुकसानीचे चित्र स्पष्ट होणार आहे. कृषी विभागाकडूनही परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असून शेतकऱ्यांनी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील विविध भागांत पावसामुळे नदी-नाले, ओढे आणि जलस्रोतांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी पाण्याच्या प्रवाहाजवळ जाणे टाळावे तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
