राज्यातील समस्त शेतकऱ्यांची आ.लोणीकर यांनी माफी मागावी
साईमत/शिंदखेडा/प्रतिनिधी :
शेतकऱ्यांच्या बाबतीत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपचे आ. बबनराव लोणीकर यांचा शिवसेना उबाठा गटातर्फे शिवाजी चौकात ‘जोडो मारो’ आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. आ.लोणीकर यांनी राज्यातील समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
लाडकी बहीण योजना व शेतकऱ्यांसाठी असलेल्या शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या परिवाराला आम्ही पोसतो, असे वादग्रस्त विधान भाजपचे आ.बबनराव लोणीकर यांनी केले होते. शिवसेना उबाठा गटाच्यावतीने लोणीकर यांच्या फोटोला जोडे मारून निषेध व्यक्त केला. यावेळी शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे म्हणाले की, शासन विविध योजनांच्या माध्यमातून देत असलेला पैसा हा या राज्यातील शेतकऱ्यांचा व नागरिकांचाच आहे. सरकार कोणत्याही प्रकारचा उपकार करत नाही. लोणीकर यांनी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे शेतकऱ्यांसह लाडक्या बहिणींची मन दुखावली गेली आहे. त्यामुळे त्यांनी समस्त महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी, अशी मागणी केली आहे.
यांची होती उपस्थिती
आंदोलनावेळी सर्जेराव पाटील, छोटू पाटील, गिरीश देसले, नंदु पाटील, रावसाहेब ईशी, मुकेश कोळी, विष्णु चव्हाण, गौतम कोळी, भाईदास पाटील, कल्याण पाटील, शैलेश सोनार, योगेश ईशी, नंदकिशोर पाटील, ईश्वर पाटील, संतोष देसले, सागर देसले, एस.डी.आण्णा यांच्यासह अनेक शिवसैनिक उपस्थित होते.