केमिकल टँकरच्या आगीने महामार्गावर खळबळ दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू
साईमत /पारोळा /प्रतिनिधी
धुळे-पारोळा महामार्गावरील सबगव्हाण टोलनाका परिसर रविवारी पहाटे भीषण अपघाताने हादरला. रासायनिक पदार्थाची वाहतूक करणारा टँकर समोरील कंटेनरवर भरधाव वेगात आदळल्यानंतर त्याला अचानक आग लागली. काही क्षणांतच आगीने टँकरला विळखा घातल्याने त्यातील दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली असून, घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, जीजे-१८ बीव्ही-८३१५ क्रमांकाचा टँकर धुळेहून पारोळ्याकडे निघाला होता. सबगव्हाण टोलनाका परिसरात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने टँकरने पुढे उभ्या असलेल्या कंटेनरला जोरदार धडक दिली. धडकेनंतर टँकरच्या टायरमधून आग भडकली आणि काही क्षणांतच संपूर्ण वाहन ज्वालांच्या भक्ष्यस्थानी पडले. आगीची तीव्रता इतकी होती की टँकरमधील दोघांना बाहेर पडण्याची संधीही मिळाली नाही.
अपघाताची माहिती मिळताच पारोळा अग्निशमन दल, पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. जवानांनी तत्परतेने आग विझविण्याचे प्रयत्न सुरू केले आणि काही वेळात परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, तोपर्यंत टँकरमधील दोघांचा मृत्यू झाला होता. मृतांची ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू असून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
दुर्घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने धुळे-पारोळा महामार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी काही काळ बंद करण्यात आली. परिणामी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी आणि महामार्ग प्रशासनाने पर्यायी व्यवस्था करून वाहतूक हळूहळू सुरळीत केली.
दरम्यान, अपघातग्रस्त टँकरमध्ये टोल्युइन डायआइसोसायनेट (TDI) हे औद्योगिक क्षेत्रात वापरले जाणारे रसायन असल्याची माहिती मिळाली आहे. या रसायनाचा वापर पॉलीयुरेथेन फोम, कोटिंग्ज, ॲडेसिव्ह्ज आणि विविध औद्योगिक उत्पादनांच्या निर्मितीत केला जातो. सुदैवाने रसायनाची मोठ्या प्रमाणावर गळती झाली नसल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली. खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित यंत्रणांनी परिसर सुरक्षित करून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. चालकाचे नियंत्रण कशामुळे सुटले, याचा तपास सुरू असून मृतांची ओळख पटविल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.
