नांदेड
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी नांदेड येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना एक अत्यंत खळबळजनक विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रीय लोकशाही आघाडीत (एनडीए) सहभागी व्हावे, असे खुले निमंत्रण आठवले यांनी दिले आहे. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकीय वर्तुळात नव्या चर्चांना उधाण आले असून, शरद पवार यांच्या पुढील राजकीय भूमिकेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
’2014 मध्येच एनडीएमध्ये आले असते तर राष्ट्रपती झाले असते’
नांदेड येथील पत्रकार परिषदेत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, “शरद पवार हे देशातील अत्यंत ज्येष्ठ आणि अनुभवी नेते आहेत. त्यांनी २०१४ किंवा २०१९ मध्येच एनडीएमध्ये प्रवेश केला असता, तर त्यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीचाही विचार होऊ शकला असता.” इतकेच नव्हे तर, त्यावेळी आपण स्वतः शरद पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएमध्ये विलय करण्याचा सल्ला दिला होता, असा मोठा दावाही आठवले यांनी यावेळी केला.
…तर मनापासून स्वागत करू!
”अजूनही वेळ गेलेली नाही,” असे म्हणत आठवले यांनी शरद पवारांना पुन्हा एकदा एनडीएमध्ये येण्याचे आवाहन केले आहे. “आजही शरद पवारांनी विकासाच्या मुद्द्यावर एनडीएमध्ये येण्यास कोणतीही अडचण नाही. एनडीएतील सर्व पक्ष विकासाच्या अजेंड्यावर एकत्र आले असून, पवारांनी जर याबाबत निर्णय घेतला तर आम्ही त्यांचे मनापासून स्वागतच करू,” असे आठवले यांनी स्पष्ट केले. शरद पवार यांच्या पक्षाकडे सध्या आठ खासदार असल्याचा उल्लेख करत, ते एनडीएमध्ये आल्यास आघाडी आणखी मजबूत होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी बोलताना त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर आणि विकासाच्या मुद्द्यावर विश्वास दाखवत विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी आणि अनेक खासदार एनडीएकडे आकर्षित होत असल्याचा दावाही केला.
प्रकाश आंबेडकरांबाबतही मोठे विधान; सत्तेत येण्याचे आवाहन
शरद पवारांशिवाय रामदास आठवले यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांच्याबाबतही एक मोठे आणि महत्त्वपूर्ण विधान केले आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. “प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या नेतृत्वाखाली काम करण्याचीही माझी तयारी आहे, त्यांनी रिपब्लिकन चळवळीत सहभागी व्हावे. भविष्यात ते सोबत आल्यास त्यांना केंद्र सरकारमध्ये मंत्रीपद मिळावे यासाठी मी स्वतः प्रयत्न करेन,” अशी दिग्गज मंत्र्याची थेट ऑफरच आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिली आहे.
रामदास आठवले यांच्या या एकाच पत्रकार परिषदेतील दोन्ही मोठ्या ऑफर्समुळे महाराष्ट्राच्या राजकीय वातावरणात कमालीची खळबळ उडाली असून, यावर आता शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, याकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले आहेत.
