साखरपुड्यानंतर महिन्यातच तरुणाची आत्महत्या
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी
जळगाव शहरातील धांडे नगर परिसरात एका २८ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. राजस संजय पाटील (वय २८) असे मृत तरुणाचे नाव असून, काही दिवसांपूर्वीच त्याचा साखरपुडा झाला होता. लवकरच विवाह होणार असल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण होते, मात्र या अनपेक्षित घटनेने संपूर्ण कुटुंब हादरून गेले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, राजस पाटील हा ठेकेदारी व्यवसायाशी निगडित काम करत होता. शुक्रवारी दुपारच्या सुमारास तो घरातील वरच्या मजल्यावर गेला होता. बराच वेळ तो खाली न आल्याने कुटुंबीयांनी त्याला हाक मारली. प्रतिसाद न मिळाल्याने आई वर गेली असता त्याने गळफास घेतल्याचे दिसून आले.
घटनेनंतर कुटुंबीयांनी तातडीने त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केले.
राजसचा साखरपुडा अवघ्या महिन्यापूर्वीच पार पडला होता आणि नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये विवाह निश्चित झाला होता. घरात लग्नाच्या तयारीची लगबग सुरू असतानाच ही दुर्दैवी घटना घडल्याने आनंदाचे वातावरण शोकात परिवर्तित झाले.
विशेष बाब म्हणजे, मृताचा वडील संजय पाटील हे ज. सु. खडके विद्यालयात मुख्याध्यापक असून ते ३० जून रोजी सेवानिवृत्त होणार होते. त्यांच्या सेवानिवृत्ती सोहळ्याचीही तयारी कुटुंबात सुरू होती. मात्र मुलाच्या मृत्यूने संपूर्ण कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.
राजस हा कुटुंबातील एकुलता एक मुलगा होता आणि त्याला एक विवाहित बहीण आहे. आत्महत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे धांडे नगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
