रिंग रोडचे ‘व्हाइट टॉपिंग’ काँक्रिटीकरण सुरू डिसेंबरपर्यंत दोन्ही बाजूंचे काम पूर्ण होणार
साईमत /जळगाव/ प्रतिनिधी :
शहरातील वाहतूक व्यवस्थेला गती देणाऱ्या आणि दीर्घकाळापासून दुरवस्थेत असलेल्या रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाचा शुभारंभ शनिवारी सायंकाळी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आला. या महत्त्वपूर्ण विकासकामामुळे जळगावकरांच्या प्रवासाचा मोठा प्रश्न सुटणार असल्याचे चित्र निर्माण झाले असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
या कार्यक्रमास भाजपा महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दीपमाला काळे, उपमहापौर मनोज चौधरी, स्थायी समिती सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, गटनेते प्रकाश बालाणी, नगरसेविका ॲड . शुचिता हाडा, माजी महापौर तथा नगरसेवक नितीन लढ्ढा यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या काही दिवसांपासून रिंग रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली होती. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनचालक व नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर रस्त्याच्या दुरुस्तीसाठी ७ कोटी रुपयांचा निधी शासनाकडून मंजूर करण्यात आला असून, हा निधी मंजूर होण्यासाठी आमदार राजूमामा भोळे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता.
दरम्यान, या भागात महापालिकेच्या भूमिगत ड्रेनेजचे काम प्रस्तावित असल्याने रस्ता पुन्हा पुन्हा खोदावा लागू नये, यासाठी आधी ड्रेनेजचे काम पूर्ण करण्याच्या सूचना आमदार भोळे यांनी दिल्या होत्या. त्यानुसार बहिणाबाई उद्यान ते गोकुळ स्वीटमार्टपर्यंतच्या एका बाजूचे ड्रेनेजचे काम मागील आठवड्यात पूर्ण करण्यात आले. निवडणूक आचारसंहिता संपताच तत्काळ रिंग रोडच्या काँक्रिटीकरणाच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
या कामाच्या पहिल्या टप्प्यात एका बाजूचे काँक्रिटीकरण सुमारे एका महिन्यात पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर क्युरिंग प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्या बाजूने वाहतूक सुरू केली जाईल आणि दुसऱ्या बाजूचे काम हाती घेण्यात येणार आहे. अधिकृतरीत्या या प्रकल्पाची मुदत दीड वर्षांची असली तरी, येत्या डिसेंबर महिन्यापर्यंत दोन्ही बाजूंचे काम पूर्ण करण्याचे नियोजन असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता व मक्तेदार गौरव राजेश पाटील यांनी दिली.
ख्वाजामिया चौक ते आकाशवाणी चौक या दरम्यानचा रिंग रोड ‘व्हाइट टॉपिंग’ पद्धतीने काँक्रिट करण्यात येणार आहे. काम सुरू असतानाच परिसरातील निकामी विजेचे पोल बदलणे, तसेच पाईपलाईन गळती दुरुस्त करणे यांसारखी कामे तातडीने पूर्ण करण्याच्या कडक सूचना आमदार भोळे यांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे रस्ता पूर्ण झाल्यानंतर पुन्हा खोदकाम करण्याची वेळ येणार नाही, असा उद्देश ठेवण्यात आला आहे.
या विकासकामामुळे शहरातील प्रमुख वाहतूक मार्ग अधिक सुगम होणार असून, नागरिकांचा वेळ व इंधन दोन्हीची बचत होणार आहे. दीर्घकाळ रखडलेला प्रश्न मार्गी लागत असल्याने जळगावकरांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
