श्रीमंतपूर/श्रीभूमी (आसाम):
आसामच्या श्रीभूमी जिल्ह्यातील बिलबारी सीमावर्ती भागात ‘पुशबॅक’वरून (कथित स्वरूपात काही लोकांना परत पाठवण्याच्या प्रयत्नावरून) भारत आणि बांगलादेशच्या सीमा सुरक्षा दलांमध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला आहे. ‘बॉर्डर सिक्युरिटी फोर्स’ (BSF) आणि ‘बॉर्डर गार्ड बांगलादेश’ (BGB) चे जवान एकमेकांसमोर उभे ठाकल्याने सीमेवर काही काळासाठी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती.
शस्त्रधारी जमाव झिरो लाईनवर: कथित नागरिकांना आपल्या हद्दीत घेण्यास BGB ने नकार दिला. ही बातमी पसरताच शेकडो बांगलादेशी नागरिक हातात चाकू, लाठ्या आणि बांबूचे दंड घेऊन BGB च्या समर्थनार्थ झिरो लाईनवर जमा झाले आणि त्यांनी भारतीय सीमेच्या दिशेने शस्त्रे उगारली.
BGB कडून गोळीबाराची धमकी: बांगलादेशच्या पल्लाथल आऊटपोस्टच्या जवानांनी लाऊडस्पीकरवरून BSF ला मागे हटण्याचा इशारा दिला. परिस्थिती बिघडल्यास थेट गोळीबार करावा लागेल, अशी उघड धमकीही BGB कडून देण्यात आली.
BSF चा संयम: अत्यंत चिथावणीखोर परिस्थिती असतानाही BSF च्या जवानांनी प्रचंड संयम दाखवला. त्यामुळे कोणताही गोळीबार किंवा जीवितहानी झाली नाही.
प्रशासन अलर्ट मोडवर: या घटनेनंतर दोन्ही बाजूंनी सीमेवर अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आसाम पोलीस आणि स्थानिक प्रशासनाला हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.
तणाव अद्याप कायम असला तरी दोन्ही देशांच्या सुरक्षा यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. या संपूर्ण प्रकरणावर अद्याप कोणत्याही बाजूने अधिकृत वक्तव्य किंवा परत पाठवण्यात येणाऱ्या लोकांच्या निश्चित संख्येचा खुलासा करण्यात आलेला नाही.
