शिवाजीनगर हादरले ३७ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली घरातील मागील खोलीत घडली दुर्दैवी घटना
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
शहरातील शिवाजीनगर परिसरात मंगळवारी (दि. ३० जून) दुपारच्या सुमारास घडलेल्या धक्कादायक घटनेत एका ३७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.मृत तरुणाचे नाव मयूर अरुण चंदनकर (वय ३७, रा. शिवाजीनगर, जळगाव) असे आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी मयूर यांची आई आणि भावजयी घराच्या समोरील खोलीत बसल्या होत्या. याचदरम्यान मयूर हे मागील खोलीत गेले आणि त्यांनी तेथे गळफास घेऊन आपले जीवन संपवले. काही वेळानंतर आईने त्यांना आवाज दिला असता प्रतिसाद न मिळाल्याने त्या मागील खोलीत गेल्या. तेव्हा मयूर हे गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच शहर पोलीस ठाण्याचे पोहेकॉ प्रवीण वाघ यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांच्या मदतीने मयूर यांना तत्काळ शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
