रोटरी क्लबचा प्रेरणादायी उपक्रम
साईमत /फैजपूर / प्रतिनिधी
दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने फैजपूर येथे रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅलीतर्फे शालेय साहित्य वाटपाचा सामाजिक उपक्रम यशस्वीपणे पार पडला. तिळ्या व अंधारमढी या अतिदुर्गम आदिवासी व गरजू भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणोपयोगी साहित्य देण्यात आले.
‘स्वतःपेक्षा सेवा श्रेष्ठ’ या ब्रीदवाक्यानुसार हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन रोटरी क्लब ऑफ सातपुडा व्हॅलीतर्फे यांच्या वतीने करण्यात आले होते.
कार्यक्रमाला क्लबचे अध्यक्ष पांडुरंग दगडू सराफ, सचिव श्रीकांत भुयार, खजिनदार निलेश चौधरी यांच्यासह प्राचार्या भारती महाजन, कॅप्टन डॉ. राजेंद्र राजपूत, असलम तडवी, राजा चौधरी तसेच मोठ्या संख्येने पालक आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या हातात वह्या, पुस्तके आणि शैक्षणिक साहित्य मिळताच त्यांच्या चेहऱ्यावर आनंद झळकला. शिक्षणासाठी आवश्यक मूलभूत साधनांच्या अभावामुळे शिक्षणात खंड पडू नये आणि विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी प्रेरणा मिळावी, या हेतूने हा उपक्रम राबविण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
यावेळी विद्यार्थ्यांनी “आम्ही शिकून पोलीस, शिक्षक, अधिकारी व डॉक्टर होऊ” अशी स्वप्नं व्यक्त केली. ग्रामस्थांनी या उपक्रमाचे कौतुक करत अशा उपक्रमांची व्याप्ती इतर दुर्गम भागांपर्यंत वाढवावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
समाजातील संवेदनशील घटकांनी पुढे येऊन केलेला हा उपक्रम आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी नवी दिशा देणारा ठरत आहे.
