गुप्त माहितीच्या आधारे विमनातळासमोरील कुंभा-धनवड रस्त्यावर रचला सापळा; २४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी आवळल्या मुसक्या
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |
शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या पथकाने २८ जून २०२६ रोजी एक मोठी कारवाई केली आहे. जळगाव विमानतळासमोरील कुंभा ते धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या एका संशयिताला पोलिसांनी सिनेमॅटिक स्टाईलने पाठलाग करून ताब्यात घेतले. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीचा एक लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा मॅगझीनसह जप्त करण्यात आला असून, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, विमानतळासमोरील कुंभा ते धनवड गावाकडे जाणाऱ्या कच्च्या रस्त्यावर एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत आहे. या माहितीची खातरजमा करून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी तात्काळ एक विशेष पथक तयार केले आणि कारवाईच्या सूचना दिल्या.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन सापळा रचला. यावेळी एक संशयित इसम पायी फिरताना दिसून आला. पोलिसांनी त्याला थांबण्याचा इशारा केला असता, त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सतर्क पोलीस पथकाने त्याचा पाठलाग करून त्याला जागीच दरोडा टाकत ताब्यात घेतले.
आरोपीचे नाव: गणेश श्रावण सोनवणे (वय २४ वर्षे, व्यवसाय-मजुरी, रा. कुंभा, ता. जि. जळगाव)
जप्त मुद्देमाल: २०,०००/- रुपये किमतीचा एक लोखंडी काळ्या रंगाचा गावठी कट्टा (मॅगझीनसह).
आरोपी गणेश सोनवणे याला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीची आणि विसंगत उत्तरे दिली. पोलिसांचा संशय बळावल्याने त्याची कायदेशीर अंगझडती घेण्यात आली. यावेळी त्याच्या जीन्स पॅन्टच्या मागील बाजूस, कमरेला खोचलेला गावठी कट्टा (मॅगझीनसह) मिळून आला. हा कट्टा पंचांसमक्ष जप्त करण्यात आला असून आरोपीविरुद्ध एम.आय.डी.सी. पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर क्र. ५७१/२०२६ अन्वये भारतीय शस्त्र अधिनियम तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वात करण्यात आली.
या यशस्वी कामगिरीत पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोहेका/१८६२ रमेश बाबूलाल चौधरी, पोहेका/७० रामकृष्ण पाटील, पोको/३४२ किरण पाटील, पोको/२०३० गणेश ठाकरे, पोको/२००५ सुभाष साळुंखे, पोको/२४९६ रमाकांत साळुंखे, पोको/६७७ राहुल येथे, पोको/२९१ नितीन ठाकूर व पोको/१३९५ शशिकांत मराठे या पथकाने उत्कृष्ट कामगिरी बजावली.
