भुसावळ प्रतिनिधी | “राजमाता जिजाऊ ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले आणि छत्रपती ताराराणी ते अंतराळवीर कल्पना चावला यांच्यापर्यंतचा महिलांचा इतिहास हा शौर्य, त्याग आणि संघर्षाचा आहे. आजची महिला घरदार सांभाळून देशाच्या प्रगतीमध्ये योगदान देत आहेच, शिवाय ती आपली धर्म आणि संस्कृती टिकवून ठेवण्यास पूर्णपणे समर्थ आहे,” असे गौरवद्गार ‘प्रतिष्ठा महिला मंडळा’च्या अध्यक्षा मा. रजनीताई सावकारे यांनी काढले.
‘ओम सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान’ संचलित *’वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघा’*च्या मासिक सभेचे आयोजन आज शनिवार, दिनांक ८ ऑगस्ट २०२६ रोजी भुसावळ येथे करण्यात आले होते. या सभेमध्ये ‘स्त्री जन्मा तुझी कहाणी…’ या विषयावर मुख्य वक्त्या म्हणून त्या बोलत होत्या.यावेळी व्यासपीठावर अध्यक्ष प्रकाश पाटील,सचिव सतीश जंगले, भानुदास पाटील,संजीव चौधरी, संयोजक डॉ. नितु पाटील आदी उपस्थित होते.
बहिणाबाईंच्या कविता या प्रबोधनाचे विद्यापीठ
आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानात रजनीताई सावकारे यांनी खान्देशच्या सुकन्या संत कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या आठवणींना उजाळा दिला. त्या म्हणाल्या की, बहिणाबाई चौधरी या जरी शालेय शिक्षण न घेतलेल्या म्हणजेच अडाणी होत्या, तरी त्यांच्या ओव्या आणि कविता या मानवी जीवनाचे मर्म सांगणाऱ्या आणि समाज प्रबोधन करणाऱ्या ठरल्या. त्यांच्या याच महान साहित्यामुळे आज जळगावच्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला त्यांचे नाव देण्यात आले आहे, जो संपूर्ण खान्देशसाठी अभिमानाचा विषय आहे. स्त्रीने स्वतःमधील ही उपजत ताकद ओळखून समाजात वावरले पाहिजे.
वासुदेव परिवाराचे उपक्रम स्तुत्य
कार्यक्रमाच्या सुरुवातीला वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने मा. रजनीताई सावकारे यांचे सहर्ष स्वागत करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नागरिकांच्या उपस्थितीने हॉल गजबजून गेला होता. वासुदेव परिवाराकडून सातत्याने राबवल्या जाणाऱ्या विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक उपक्रमांचे रजनीताईंनी विशेष कौतुक केले.
यावेळी ललिता टोके यांनी स्वरचित स्त्री काळानुसार बदल यावर कविता सादर केली. सोबत प्रकाश पाटील यांनी पण सोशल मीडियावर व्हायरल झालेली कविता सादर केली.
या मासिक सभेला प्रतिष्ठानचे पदाधिकारी, वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व सन्माननीय सभासद, महिला भगिनी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन सतीश जंगले,वक्ता परिचय डॉ. नितु पाटील,तर आभार प्रदर्शन संजीव चौधरी यांनी केले.कार्यक्रमाची सांगता अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात झाली.
