जळगाव – जळगाव शहरालगत असलेल्या पाळधी–तरसोद बायपास महामार्गावरील पुलाचा काही भाग दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे खचला होता. या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा, स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील आणि आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी आज प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पुलाची पाहणी केली.
पावसाच्या पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे पुलाच्या संरचनेला झालेल्या नुकसानीची आणि वाहतुकीच्या सुरक्षिततेची सविस्तर माहिती दोन्ही मंत्र्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांकडून घेतली.
केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठवण्याची मागणी
पाहणीदरम्यान आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला. या पुलाची तातडीने तांत्रिक पाहणी करण्यासाठी केंद्रीय तज्ज्ञ पथक पाठवण्यात यावे, तसेच नुकसानीचे सर्वेक्षण करून दुरुस्तीचे काम युद्धपातळीवर सुरू करावे, अशी विनंती त्यांनी केली.
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य
पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी संबंधित यंत्रणांना निर्देश दिले की:
नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देऊन आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी.
पर्यायी वाहतूक व्यवस्था प्रभावीपणे लागू करावी.
सर्व संबंधित विभागांनी आपापसांत समन्वय ठेवून दुरुस्तीची प्रक्रिया वेगाने पूर्ण करावी.
प्रशासनाकडून उपाययोजनांची माहिती
जिल्हाधिकारी रोहन घुगे यांनी परिसरातील सद्यस्थिती, वाहतुकीवर झालेला परिणाम आणि प्रशासनामार्फत करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. तसेच पोलीस प्रशासनाने वाहतुकीचे योग्य नियोजन केले असून नागरिकांची गैरसोय होणार नाही यासाठी विशेष काळजी घेतली जात असल्याचे स्पष्ट केले.
प्रमुख उपस्थिती:
या पाहणीदरम्यान आमदार सुरेश भोळे, महापौर दीपमाला काळे, नशिराबाद नगरपरिषदेचे नगराध्यक्ष योगेश पाटील, जिल्हाधिकारी रोहन घुगे, पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे, महानगरपालिका आयुक्त आदित्य जीवने, उपविभागीय अधिकारी विनय गोसावी, तहसीलदार शितल राजपूत आणि राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी व स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
