भुसावळ (प्रतिनिधी): “पोट भरल्याशिवाय कोणीही कोणतेही कार्य करू शकत नाही; त्यामुळे प्रत्येक प्राण्याला दुपारी अन्न मिळालेच पाहिजे,” या भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या विचारांमधून प्रेरणा घेत भुसावळात एका विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. भगवान श्री नित्यानंद गुरुदेवांच्या ६५ व्या पुण्यतिथीनिमित्त (आषाढ द्वादशी) ‘ऊँ सिद्धगुरू नित्यानंद प्रतिष्ठान’च्या वतीने सलग आठव्या वर्षी हा अन्नदान व शैक्षणिक मदत उपक्रम पार पडला.
जिल्हा परिषद शाळा, महादेव माळ येथील विद्यार्थ्यांना याप्रसंगी बटाट्याची भाजी, पुरी आणि श्रीखंड अशा महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. भोजनाची जबाबदारी तळवेल येथील चेतनभाऊ झोपे व त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली.
४० गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केवळ अन्नदानच नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपत प्रतिष्ठानच्या वतीने शाळेतील ४० गरजू विद्यार्थ्यांना नवीन दप्तर (School Bags) आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. नवीन दप्तर मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता.
यावेळी वक्त्यांनी सौ. उज्वल कुंटे लिखित ‘आपले बाबाजी’ पुस्तकातील संदर्भांचा उल्लेख करत अन्नदानाचे महत्त्व विशद केले. अन्नदानामुळे मानवी जीवनातील व्याधी आणि दोष दूर होऊन समाधान मिळते, याच भावनेतून गुरुदेवांचा बालभोजनाचा वारसा प्रतिष्ठान पुढे चालवत असल्याचे सांगण्यात आले.
या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक निलेश पाटील, सहशिक्षिका मीनाक्षी पाटील, तुकाराम पाटील, वैशाली पाटील, डॉ. नितु पाटील, डॉ. रेणुका पाटील, राहुल माळी, अनिकेत चव्हाण, राम शेटे, विवेक पाटील आणि चेतन झोपे हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तोषल पाटील, वेदांत, दुर्वांग, दीपक फेगडे, योगेश मगरे, मझर शेख, गोलू शेख, कृष्णा माळी, साहिल माळी व मनोज गोसावी यांनी परिश्रम घेतले.
