घरगुती पाणी मोटार सुरू करताना शॉक लागून महिलेचा मृत्यू
साईमत/भुसावळ/ प्रतिनिधी :
तालुक्यातील फेकरी येथे रविवार सकाळी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत पाणी भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विद्युत मोटारीत अचानक प्रवाह उतरल्याने ५५ वर्षीय महिलेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मृत महिलेचे नाव अलका पंडित जामोदकर (वय ५५) असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्या नेहमीप्रमाणे सकाळी सुमारे ८.३० वाजता घरगुती वापरासाठी पाणी भरण्याकरिता विद्युत मोटार सुरू करत होत्या. त्याच वेळी मोटारीत अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने त्यांना जोरदार शॉक बसला आणि त्या गंभीररीत्या जखमी झाल्या.
घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ धाव घेत जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या दुर्दैवी घटनेमुळे जामोदकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून फेकरी गावात शोककळा पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी या घटनेबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली असून घरगुती विद्युत उपकरणांच्या सुरक्षित वापराबाबतही चर्चा सुरू झाली आहे.
