गुन्हेगारी प्रवृत्तीचे व्हिडिओ स्टंटबाजीच्या रील्स आणि आक्षेपार्ह रील्सवर करणाऱ्यांवर सायबर पथकाची कारवाई
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी तयार करण्यात येणाऱ्या समाजविघातक रील्सवर आता जळगाव पोलिसांची करडी नजर आहे. गुन्हेगारीचे उदात्तीकरण करणारे व्हिडिओ, वाहतूक नियमांचे उल्लंघन करत केलेली स्टंटबाजी तसेच महिलांचा अवमान करणारा आक्षेपार्ह आशय प्रसारित करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे. सायबर पॅट्रोलिंगच्या माध्यमातून अशा रील्सची तपासणी करून संबंधित तरुणांची ओळख पटविण्यात आली असून त्यांना पोलिस मुख्यालयात बोलावून समज देण्यात आली आहे.
सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात अशा रील्सचा प्रसार होत आहे. केवळ अधिकाधिक व्ह्यूज आणि प्रसिद्धी मिळविण्याच्या उद्देशाने काही तरुणांकडून कायद्याचा धाक नसल्याचे दाखवणारे, गुन्हेगारी प्रवृत्तीचे समर्थन करणारे तसेच धोकादायक स्टंटचे प्रदर्शन करणारे व्हिडिओ तयार केले जात आहेत. या प्रकाराचा विशेषतः तरुण पिढीवर विपरीत परिणाम होत असून, काही जण अशा कृत्यांचे अनुकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसून येत आहे.
वाहतूक नियमांचे उल्लंघन करून तयार केलेल्या रील्समुळे संबंधित व्यक्तीसह रस्त्यावरील इतर नागरिकांच्या जीवितालाही धोका निर्माण होऊ शकतो. तसेच महिलांविषयी अपमानास्पद किंवा चुकीचा संदेश देणारा आशय समाजातील सन्मान आणि संवेदनशीलतेला बाधा पोहोचवणारा ठरत आहे.
या वाढत्या प्रकारांची गंभीर दखल घेत जळगाव पोलिसांनी सोशल मीडिया मॉनिटरिंग अधिक प्रभावी केले आहे. सायबर पथकाकडून विविध सोशल मीडिया माध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, आक्षेपार्ह रील्स तयार करणाऱ्यांची माहिती संकलित केली जात आहे. पोलिसांनी अशा रील्समधील संबंधित व्यक्तींची ओळख पटवून त्यांना पोलिस मुख्यालयात बोलावले.
यावेळी संबंधितांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. भविष्यात अशा प्रकारचे कृत्य टाळावे, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशाराही देण्यात आला.
पोलिसांच्या या कारवाईमागे केवळ कारवाई करणे किंवा भीती निर्माण करणे हा उद्देश नसून, तरुणांना चुकीच्या प्रवृत्तीपासून दूर ठेवणे, कायद्याचा आदर निर्माण करणे आणि सोशल मीडियाचा सकारात्मक वापर करण्याचा संदेश देणे हा मुख्य हेतू आहे. जळगाव पोलिसांच्या या उपक्रमामुळे समाजविघातक प्रवृत्तींना आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
