साईमत लाईव्ह मुंबई प्रतिनिधी :
शिवसेनेतील बंडाळीमुळे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांना मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)यांच्या गटात शिवसेनेचे (Shivsena)जवळपास सर्वच आमदार सहभागी झाल्याने महाविकास आघाडीचे सरकार अल्पमतात आले होते. त्यानंतर सर्व राजकीय परिस्थिती बघता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा राज्यपालांकडे सोपवला. त्यामुळे आपसूकच महाविकास आघाडीचे सरकार (MVA Govt)कोसळले. तर दुसरीकडे भाजपने शिंदे गटाला सोबत घेऊन सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू केल्या आहेत. आता राज्यात भाजपाशासित सरकार येणार हे जवळपास निश्चित मानले जात असून पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) मुख्यमंत्रिपदावर बसणार आहे. अशातच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने विरोधी बाकावर बसण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्याच्या विधानसभेचा विरोधी पक्षनेता खरंतर ‘शॅडो मुख्यमंत्री’ म्हणून ओळखला जातो. सध्याचे विधानसभेतील संख्याबळ पाहता राष्ट्रवादी काँग्रेस विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. कारण राष्ट्रवादीचे काँग्रेसचे (NCP) विधानसभेत ५३ आमदार आहेत. तर शिवसेनेचे ५५ आमदार असले तरी बंडखोरीमुळे ३९ आमदारांनी वेगळा मार्ग स्वीकारला आहे. शिंदे गटाकडून त्यांचा गटच मूळ शिवसेना असल्याचा दावा केला असून हे प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे. अशात विरोधी पक्षनेतेपद राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला येऊ शकतं आणि अजित पवार (Ajit Pawar) विरोधी पक्षनेत्याची भूमिका बजावू शकतात.
महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार यांचा दबदबा होता. उपमुख्यमंत्रीपद आणि अर्थमंत्रीपद अशी दोन्ही महत्त्वाची पदे अजित पवार यांच्याकडे होती. अजित पवारांचा हाच दबदबा कायम ठेवत ते राज्याच्या विरोधी पक्षनेतेपदाच्या भूमिकेत बघायला मिळू शकतील.