साईमत न्यूज नेटवर्क –
महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन अद्याप लांबणीवर पडले असून, तो सक्रिय होण्यासाठी आणखी ५ ते ६ दिवसांचा विलंब होण्याची शक्यता पुणे हवामान वेधशाळेने वर्तवली आहे. राज्यात सध्या मान्सूनसाठी अनुकूल वातावरण नसल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.
पुढील २४ ते ४८ तासांत राज्यातील काही भागांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मान्सूनला महाराष्ट्रात, विशेषतः मुंबईसह उर्वरित भागात पोहोचण्यासाठी २० जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागू शकते. सध्या मान्सून मध्य महाराष्ट्रातच अडकला असून, उत्तर भारतातील उष्ण वाऱ्यांमुळे त्याची पुढील वाटचाल थांबली आहे.
विदर्भात तापमान पुन्हा ४३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. गरम आणि कोरड्या वाऱ्यांमुळे मान्सूनचा प्रवास रोखला गेला असून, हे वारे कमी झाल्यानंतरच मान्सून पुढे सरकण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, मान्सूनने हैदराबाद, ओडिशा किनारपट्टी, पश्चिम बंगाल, झारखंड आणि बिहारच्या काही भागांपर्यंत मजल मारली आहे. मात्र महाराष्ट्रात अजूनही त्याची प्रगती मंदावलेली आहे. काही भागांमध्ये वादळी पावसाची नोंद होत असली तरी मान्सून पूर्णपणे सक्रिय झालेला नाही.
ही माहिती हवामान वेधशाळेचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप यांनी दिली आहे.
