साईमत न्यूज नेटवर्क –
मध्य प्रदेश मोरेना जिल्ह्यातील हेतामपूर रेल्वे स्थानकाजवळ रविवारी भीषण रेल्वे दुर्घटना घडली. उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेसमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्याने प्रवाशांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आणि अनेक प्रवासी गाडीतून खाली रुळांवर उतरले. त्याचवेळी शेजारच्या रुळावरून येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेसने त्यांना धडक दिल्याने मोठा अपघात घडला.
या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. मृतांमध्ये तीन महिला आणि एका मुलाचा समावेश आहे. मृतांची ओळख आफरीन (३५), अशद (४), शकुंतला (६०) आणि वीरमा देवी (५८) अशी झाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उदयपूर इंटरसिटी एक्सप्रेस रविवारी दुपारी ४ वाजता मोरेनाहून धोलपूरच्या दिशेने जात होती. हेतामपूर स्थानकाजवळ गाडीला आग लागल्याची अफवा पसरली. या अफवेमुळे प्रवासी घाबरले आणि त्यांनी धावत्या गाडीतून खाली उड्या मारल्या.
त्याच वेळी दुसऱ्या रुळावरून वेगाने येणाऱ्या पातालकोट एक्सप्रेस (गाडी क्रमांक २०४२४) ने रुळावर उतरलेल्या प्रवाशांना धडक दिली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन, आरपीएफ आणि पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि मदत व बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
