शिक्षक कॉलनीतील थरारक घटना; गंभीर जखमी पत्नीवर नांदेडमध्ये उपचार, आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना
साईमत न्यूज नेटवर्क –
नांदेड : जिल्ह्यातील लोहा शहरातील शिक्षक कॉलनी परिसरात कौटुंबिक वादातून एका पतीने पत्नीवर गावठी कट्ट्यातून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री घडली. या हल्ल्यात पत्नी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर नांदेड येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबारानंतर आरोपी पती घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल जाधव आणि त्यांची पत्नी अर्चना जाधव यांच्यात मध्यरात्रीच्या सुमारास कौटुंबिक कारणावरून वाद झाला. वादाचे रूपांतर तीव्र भांडणात झाल्यानंतर विशालने घरातील गावठी कट्टा काढून अर्चना यांच्यावर सलग तीन गोळ्या झाडल्या.
या गोळीबारात एक गोळी अर्चना यांच्या कानाला चाटून गेली, तर दुसरी गोळी त्यांच्या पाठीत घुसली. गंभीर जखमी झालेल्या अर्चना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर जखमींना तातडीने नांदेड येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच नांदेडच्या पोलीस अधीक्षक डॉ. नीलम रोहन यांच्यासह लोहा पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तपासासाठी फॉरेन्सिक आणि फिंगरप्रिंट पथकालाही पाचारण करण्यात आले. पथकाने घटनास्थळावरील महत्त्वाचे पुरावे संकलित केले असून त्याआधारे तपास सुरू आहे.
दरम्यान, आरोपी विशाल जाधव याच्यावर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. मे २०२५ मध्ये पेट्रोल पंप लुटीच्या प्रकरणात त्याच्यावर गुन्हा नोंद असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीला अटक करण्यासाठी विशेष पथके विविध ठिकाणी रवाना करण्यात आली असून त्याचा शोध सुरू आहे.
भरवस्तीतील या गोळीबाराच्या घटनेमुळे लोहा शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास लोहा पोलीस करीत आहेत.
