साईमत न्यूज नेटवर्क –
बदलापूर येथील एरंजाड गावात पत्नीची हत्या करून तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोस्टमॉर्टम अहवालातून खून झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी पती आणि सासूला अटक केली आहे.
मृत महिलेचे नाव प्राजक्ता मेहेर असून तिचे 2010 साली योगेश मेहेर यांच्याशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुले आहेत. मात्र काही काळापासून योगेशचे गावातीलच एका महिलेसोबत प्रेमसंबंध असल्याचा आरोप आहे. याच कारणातून तो पत्नीवर घटस्फोटासाठी दबाव टाकत होता.
माहितीनुसार, 14 मार्च 2026 रोजी योगेशने प्राजक्ताच्या माहेरच्यांना बोलावून “हवे तेवढे पैसे घेऊन मुलीला घेऊन जा” अशी ऑफर दिल्याचा आरोप मृत महिलेच्या वडिलांनी केला आहे. त्यानंतर 8 एप्रिल रोजी दोघांमध्ये पुन्हा वाद झाला होता.
9 एप्रिल रोजी योगेशने प्राजक्ताच्या कुटुंबीयांना तिचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचे सांगितले. सुरुवातीला पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र संशय निर्माण झाल्याने जेजे रुग्णालयात पोस्टमॉर्टम करण्यात आले. 23 जून रोजी आलेल्या अहवालात प्राजक्ताचा मृत्यू नाक-तोंड दाबून गळा दाबून खून केल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर बदलापूर पश्चिम पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करत पती योगेश मेहेर आणि सासू अरुणा मेहेर यांना अटक केली आहे. या प्रकरणात इतर काही व्यक्तींनाही आरोपी करण्याची मागणी कुटुंबीयांनी केली असून पोलीस तपास सुरू आहे.
