साईमत न्यूज नेटवर्क –
रायगड : किल्ले रायगडावर जाणाऱ्या शिवभक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. रायगड किल्ल्यावर रोपवेने प्रवास करणे आता अधिक सोपे आणि कमी खर्चिक होणार असून, तिकीट दरात मोठी कपात करण्यात आली आहे. पूर्वी प्रतिव्यक्ती सुमारे ३५० रुपये आकारले जात होते, मात्र आता हा दर ५० ते १०० रुपयांपर्यंत कमी होणार असल्याची माहिती समोर आली आहे.
महाराष्ट्र सरकारच्या या निर्णयामुळे शिवभक्तांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्वस्त दरात रोपवे सुविधा उपलब्ध झाल्यामुळे आता कोणत्याही वयोगटातील शिवभक्तांना कमी वेळेत आणि कमी खर्चात रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेणे अधिक सुलभ होणार आहे.
सध्या रोपवेचा उच्च खर्च सर्वसामान्यांना परवडत नसल्याने अनेक शिवभक्त पायी गड चढण्याचा पर्याय निवडतात. मात्र नवीन दर लागू झाल्यानंतर प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार असून पायी चढाईचा त्रास कमी होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने दुर्गराज रायगडावर अत्याधुनिक रोपवे उभारण्याचा निर्णय घेतला असून, या प्रकल्पाला पुरातत्व विभागाकडूनही मान्यता मिळाल्याची माहिती आहे. लवकरच या नवीन रोपवेच्या कामाला सुरुवात होणार असून त्यातून प्रवास अधिक सुरक्षित आणि स्वस्त होणार आहे.
रायगड विकास प्राधिकरणाच्या माहितीनुसार, सध्या खासगी रोपवे ऑपरेटरकडून प्रतिव्यक्ती सुमारे ३२५ रुपये दर आकारला जात आहे. तसेच गडावरील संवर्धन कामांसाठी लागणाऱ्या साहित्याच्या वाहतुकीसाठी प्रतिकिलो दराने अतिरिक्त शुल्क आकारले जात असल्याने एकूण खर्च वाढत होता. या पार्श्वभूमीवर सरकारकडून स्वस्त दरात रोपवे सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.
