फैजपूर ता. यावल : प्रतिनिधी
तालुक्यातील आमोदा उपसा जलसिंचन योजना गेले अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. संस्थेच्या पंप हाऊस मधील मोटार, पाईप अनेक साहित्य चोरीला गेले आहे. याकडे शासनाने लक्ष देणे गरजेचे बनले आहे. तत्कालीन आमदार स्व. हरिभाऊ जावळे यांनी आमोदा,भालोद, बामणोद या उपसा योजनांच्या पुनरुज्जीवन साठी लागणाऱ्या मान्यता व 80 कोटींचा निधी 2018 साली मंजूर करून आणला होता. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा झालेला पराभव व कोविड-19 मध्ये कोरोनामुळे त्यांचे झालेले निधन यानंतर कुणीही या प्रकल्पाकडे लक्ष दिले नाही. त्यामुळे या प्रकल्पाची कोणत्याही प्रकारची कामे सुरू झाले नाही.
आमोदा येथील उपसा सिंचन यंत्रणा अगदी जुनी झाल्याने व अनेक वस्तू चोरीला सुध्दा गेल्या आहेत त्यामुळे सिंचनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. आमोदा, बामणोद, भालोद हा पट्टा केळी, ऊस आदि पिकांचे क्षेत्र म्हणून ओळखला जातो. परंतु उन्हाळयात जमिनीची पातळी अगदी खाली गेल्यामुळे या पिकांचे क्षेत्र घटले आहे. त्यातच उपसा योजना बंद असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना अडचणींचा सामना करावा लागतो. स्व. हरिभाऊ जावळे आमदार असतांना त्यांनी तत्कालीन जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यात आमोदा उपसा योजना (27 कोटी 39 लाख) भालोद उपसा योजना (29 कोटी 50 लाख) व बामणोद उपसा योजनेसाठी (21 कोटी 63 लाख) निधींच्या अंदाजपत्रकांना मंजुरी दिली होती. परंतु एवढे असून सुद्धा आज पर्यंत या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही. या उपसा योजनांचे पुनरुज्जीवन झाले तर एकूण 2600 हेक्टर क्षेत्र ओलिता खाली येऊन परिसर सुजलाम सुफलाम होईल.
याबाबत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाच्या यावल तालुका अध्यक्ष चेतन चौधरी यांनी माहिती अधिकार कायद्या अंतर्गत या प्रकरणाला वाचा फोडली होती. संबंधित विभागाने त्यांना आमच्याकडे मनुष्यबळ नाही अशा प्रकारचे उत्तर दिले होते. शासनाने याकडे लक्ष देऊन लवकरात लवकर योजना कार्यान्वित करावी अशी मागणी परिसरातील शेतकरी करीत आहे.