पिस्तूल, काडतुसे, बनावट नंबर प्लेटसह टोळीचा पर्दाफाश
साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी :
जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या धाडसी आणि सतर्क कारवाईत दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन संशयित आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, दोरी, मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट असा महत्त्वाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या घटनेमुळे मुक्ताईनगर परिसरात एकच खळबळ उडाली असून फरार झालेल्या मुख्य आरोपीसह आणखी दोघांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष पथके रवाना केली आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवरील पुलाजवळ पहाटे एका स्कॉर्पिओ वाहनाचा किरकोळ अपघात झाला होता. याचवेळी परिसरात नियमित गस्त घालत असलेल्या मुक्ताईनगर पोलीस ठाण्याच्या सेकंड मोबाईल पथकाला घटनेची माहिती मिळाली. पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता पोलिसांची चाहूल लागताच वाहन चालकासह दोन संशयितांनी पळ काढला. मात्र वाहनात असलेल्या अन्य दोन जणांना पोलिसांनी तत्काळ ताब्यात घेतले.
पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या संशयितांकडे चौकशी केली असता त्यांच्या हालचालींबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला. त्यानंतर स्कॉर्पिओ वाहनाची सखोल झडती घेण्यात आली. या झडतीत एक देशी बनावटीचे पिस्तूल (कट्टा), दोन जिवंत काडतुसे, लोखंडी रॉड, एक मजबूत दोरी, दोन मोबाईल फोन आणि बनावट क्रमांक प्लेट आढळून आली. जप्त करण्यात आलेल्या साहित्यावरून आरोपी मोठ्या गुन्ह्याच्या तयारीत असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
तपासादरम्यान फरार झालेला वाहन चालक प्रशांत उर्फ परशुराम गायकवाड असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशांत गायकवाड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वाहन चोरी, दरोडा, दरोड्याची तयारी आणि इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. बीड, अहिल्यानगर, बुलढाणा, पुणे, नाशिक, धाराशिव आणि संभाजीनगर जिल्ह्यांतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याची गुन्हेगारी नोंद असून यापूर्वी त्याच्यावर एमपीडीए अंतर्गत कारवाईही करण्यात आली होती. त्याला बीड कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड शहर, त्र्यंबकेश्वर, खुलताबाद, सिडको संभाजीनगर, एमआयडीसी अहिल्यानगर, पाथर्डी, उमरगा, यवत आणि तोफखाना या पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्याविरुद्ध गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यामुळे या टोळीचे राज्यव्यापी गुन्हेगारी जाळे असल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.
या प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २२८/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(४) तसेच शस्त्र अधिनियम कलम ३/२५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे चंद्रकांत विष्णू वाघ आणि कैलास कारभारी घोडके अशी असून त्यांच्याकडे सखोल चौकशी सुरू आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली असून या कारवाईमुळे संभाव्य मोठा गुन्हा टळल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.
