भरधाव रेती डंपरची दुचाकीला भीषण धडक दोघांचा जागीच मृत्यू, नागरिकांचा प्रशासनावर संताप
साईमत/मुक्ताईनगर/ प्रतिनिधी :
शहरात सुरू असलेल्या अवैध रेती, मुरूम आणि माती वाहतुकीच्या वाढत्या दहशतीने अखेर दोन निष्पापांचे जीव घेतल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. बऱ्हाणपूर रोडवरील स्मशानभूमीजवळ मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात भरधाव डंपरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण मुक्ताईनगर शहरात भीती, संताप आणि प्रशासनाविरोधात तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास रेती, मुरूम व मातीची अवैध वाहतूक करणारा डंपर भरधाव वेगाने शहरातून जात होता. याचवेळी दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोघांना डंपरने जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर डंपर चालक वाहनासह पसार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.
या अपघातात मृत्यूमुखी पडलेले दोघेही मध्यप्रदेशातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. ते मुक्ताईनगर परिसरात शेतीच्या कामासाठी सालदार म्हणून आले होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळत आहे. मात्र, मृतांची अधिकृत ओळख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून पुढील तपास वेगाने सुरू आहे.
दरम्यान, या भीषण घटनेनंतर शहरातील अवैध डंपर वाहतुकीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, रात्रीच्या वेळी शहरातून मोठ्या प्रमाणात रेती, मुरूम आणि मातीची अवैध वाहतूक केली जाते. भरधाव वेगाने धावणारे डंपर, वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन आणि संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष यामुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा आरोप करत तीव्र संताप व्यक्त केला आहे. “वारंवार तक्रारी करूनही प्रशासन ठोस कारवाई का करत नाही?”, “निष्पाप नागरिकांचे जीव गेल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?” असे संतप्त सवाल उपस्थित केले जात आहेत. शहरात वाढत्या अवैध वाहतुकीमुळे रस्ते धोकादायक बनले असून नागरिकांनी तात्काळ कठोर कारवाईची मागणी केली आहे.
