रस्ते मोकळे करा, अन्यथा कारवाई व्यापारी व ट्रान्सपोर्ट धारकांना कायदेशीर नोटीस
साईमत /जळगाव / प्रतिनिधी
जळगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या दाणाबाजार परिसरात वाढत्या वाहतूक कोंडीला आणि सार्वजनिक रस्त्यांवरील बेशिस्त पार्किंगला आळा घालण्यासाठी शहर वाहतूक शाखेने कठोर पावले उचलली आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरातील व्यापारी, दुकानदार आणि ट्रान्सपोर्ट धारकांना सार्वजनिक रस्त्यांवर अवजड वाहने विनाकारण उभी न करण्याबाबत अधिकृत कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे.
शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम यांनी ही नोटीस जारी केली असून, मोटार वाहन कायदा १९८८ तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यातील संबंधित तरतुदींनुसार कठोर कारवाईचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. दाणाबाजार हा जळगाव शहरातील प्रमुख व्यापारी केंद्र असून येथे दररोज मोठ्या प्रमाणात मालवाहतूक होत असते. मात्र, काही व्यापारी आणि ट्रान्सपोर्ट धारकांकडून दुकानांसमोर ट्रक, टेम्पो यांसारखी अवजड वाहने दिवसभर उभी ठेवली जात असल्याचे वाहतूक शाखेच्या निदर्शनास आले आहे.
नियमांनुसार या परिसरात मालाची चढ-उतार करण्यासाठी सकाळी ११ ते दुपारी ४ तसेच रात्री ९ ते सकाळी ६ या वेळेतच परवानगी देण्यात आली आहे. तरीही अनेक ठिकाणी दिवसभर वाहने उभी राहत असल्याने रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात अडथळे निर्माण होत असून नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. हे कृत्य मोटार वाहन कायदा १९८८ च्या कलम १२२ चे उल्लंघन असल्याचे नोटीसमध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
रस्त्यावर बेकायदेशीरपणे वाहने उभी राहिल्यामुळे पादचारी, वाहनचालक तसेच स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, वाहतूक व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होत असल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे. त्यामुळे मालाची चढ-उतार करताना वाहने जास्तीत जास्त ३० ते ४५ मिनिटांपर्यंतच उभी ठेवावीत, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत.
माल प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित वाहने तात्काळ शहराबाहेरील निर्धारित पार्किंग क्षेत्रात हलविणे बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच सार्वजनिक रस्त्यांचा वापर कोणत्याही परिस्थितीत खासगी पार्किंग किंवा गोदामासारखा करता येणार नाही, असेही नोटीसमध्ये ठामपणे सांगण्यात आले आहे.
नियमांचे उल्लंघन झाल्यास अडथळा निर्माण करणारी वाहने टोईंग करून जप्त करण्यात येतील आणि त्याचा संपूर्ण खर्च वाहनमालकांकडून वसूल केला जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. याशिवाय दंडात्मक कारवाईबरोबरच महाराष्ट्र पोलीस कायद्यानुसार फौजदारी कारवाई प्रस्तावित केली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
दाणाबाजार परिसरातील वाहतूक कोंडी कमी करून नागरिकांना सुरळीत वाहतूक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही कारवाई करण्यात येत असून, व्यापारी व वाहनधारकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.
