वरणगावकरांनी देवी मातेला उत्साहाने दिला निरोप

0
17

साईमत, वरणगाव : प्रतिनिधी

शहरासह परिसरात १०६ मंडळांनी नवरात्रोत्सवात घटस्थापनेसह देवी मातेच्या मूर्तीची स्थापना केली होती. यापैकी काहींनी बुधवारी तर काही मंडळांनी गुरुवारी सवाद्य मिरवणुकीने देवी मातेच्या मुर्तींचे उत्साहात विसर्जन केले. यावेळी शांततेसाठी पोलिसांनी महत्त्वाची भुमिका निभावली. वरणगाव शहरासह परिसरात ३८ सार्वजनिक तर ६८ खासगी नवरात्र उत्सव मंडळांनी घटस्थापनेसह देवी मातेच्या मुर्तींची स्थापना केली होती. या मंडळापैकी बुधवारी ३५ तर गुरुवारी ७१ मंडळानी भक्ती भावाने तसेच उत्साहाने देवी मातेच्या मुर्तींचे हतनूर धरण नदीपात्रात विसर्जन केले.

विसर्जन मिरवणुकीत अनेक मंडळांनी पारंपरीक वाद्ये, लेझीम पथक, बॅन्ड पथक तसेच डिजेचा समावेश केला होता. मिरवणुकीत तरुणींनीही सहभाग नोंदवून स्वरक्षणार्थ चित्तथरारक प्रात्यक्षिके करून दाखविली. विसर्जन मिरवणूक शांततेत पार पडावी, यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ, पोलीस उपनिरीक्षक परशुराम दळवी, होमगार्ड पथकाचे संजय चौधरी यांच्यासह सर्व पोलीस व होमगार्ड यांनी महत्त्वाची भुमिका निभावली.

प्रतिभा नगरमधील मंडळांने बुधवारीच केले विसर्जन

शहरातील शिव-शक्ती शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ प्रतिभानगरच्यावतीने बुधवारी सायंकाळी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक आशिषकुमार आडसुळ यांच्याहस्ते आरती करून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात केली होती. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक आडसुळ यांच्या हस्ते मंडळातील पदाधिकाऱ्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच गुरुवारी मंडळाच्यावतीने मिरवणुकीत सहभागी असलेल्या शहरातील सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here