मुंबई : प्रतिनिधी
आज मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या द्रौपदी मुर्मू (Draupadi Murmu) या मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची(Uddhav Thackeray) भेट घेणार नाहीत. मात्र शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट घेणार असल्याची मोठी माहिती भाजप नेते सी टी रवी यांनी दिली आहे. या नव्या राजकीय डावाने निश्चितच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)यांची धाकधूक वाढली आहे.
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मी यांचं आज मुंबईत आगमन झालं आहे. आदिवासी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे मुर्मू यांना पाठिंबा देण्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. मात्र आज मुंबईतील दौऱ्यात द्रौपदी मुर्मू या उद्धव ठाकरेंची भेट घेणार नाहीत, असे स्पष्टीकरण सी टी रवी यांनी दिले. याउलट शिवसेनेचे खासदार मुर्मू यांची भेट घेतील, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे बंडखोर आमदारांनंतर खासदारही उद्धव ठाकरेंच्या शब्दाबाहेर जाऊन वेगळी चूल मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि जर असे झाले तर हा उद्धव ठाकरेंसाठी सर्वांत मोठा धक्का असेल.
द्रौपदी मुर्मू यांच्या मुंबई दौऱ्याची माहिती देताना सी टी रवी म्हणाले, द्रौपदी मुर्मू यांची कामगिरी उल्लेखनीय आहे. त्यांनी नगरसेवक, आमदार म्हणूनही काम केले आहे. महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांनी द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा दिल्याबद्दल आम्ही त्यांचे मनापासून आभार मानतो. उद्धव ठाकरे आणि द्रौपदी मुर्मू यांच्या भेटीबाबतचा निर्णय अद्याप झालेला नाही. मात्र १६ जुलै रोजी शिवसेना खासदार त्यांना भेटू शकतात. द्रौपदी मुर्मू यांना त्यांच्यासाठी एक तासाचा वेळ राखून ठेवला आहे
दरम्यान, द्रौपदी मुर्मू यांनी शिवसेनेत यावे म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर केलेला नाही. किंवा या निर्णयामागे कोणताही राजकीय फायदा घेण्याची आमची भूमिका नाही. आदिवासी समाजाबद्दल आमच्या मनात आदर आहे. त्यामुळेच आम्ही हा पाठिंबा जाहीर केल्याचे, स्पष्टीकरण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिले आहे.