मुंबई : प्रतिनिधी
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि शिवसेनेतील ४० आमदारांनी केलेल्या बंदमुळे उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले. तसेच शिवसेनेतून मोठ्या प्रमाणात आऊटगोईंगही सुरू झाले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंसमोर शिवसेनेचे अस्तिव टिकवण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. दरम्यान, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली या महानगरपालिकेतील शिवसेनेचे बहुतांश माजी नगरसेवक शिंदेगटात दाखल झाल्यानंतर आता मुंबई लगतच्या मीरा-भाईंदर महानगरपालिकेतील तब्बल १८ नगरसेवक आणि प्रमुख पदाधिकारी काही वेळातच शिंदे गटात सहभागी होणार आहेत.
आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानंतर हे १८ नगरसेवक, शिवसेनेचे अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील होतील. मीरा भाईंदर शहरात मागील १३ वर्षांमध्ये शिवसेना पक्ष संघटन मजबूत करण्यात आणि पक्ष वाढविण्यामध्ये आमदार सरनाईक यांचा मोलाचा वाटा आहे. महापालिकेचे १८ शिवसेना नगरसेवक, तसंच मीरा भाईंदर शहराची नवीन कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आहे. त्या कार्यकारिणीमधील अनेक प्रमुख पदाधिकारी-शिवसैनिक शिंदे गटाला पाठिंबा देणार आहेत. आमदार प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल लिलामध्ये हे नगरसेवक मुख्यमंत्र्यांची भेट
घेणार आहेत.