उद्धव ठाकरेच पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत ; ‘मातोश्री’वर शिवसेना जिल्हाप्रमुखांनी व्यक्त केली इच्छा

0
3

मुंबई : प्रतिनिधी 

राज्यात शिंदे यांनी केलेल्या बंडखोरीमुळे ठाकरे सरकार कोसळले. त्यानंतर शिंदे यांनी भाजपसोबत नवीन सरकार स्थापन केले. या घडामोडीनंतर शिवसेना पुन्हा उभी करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे अ‌ॅक्शन मोडवर आले आहे. ठाकरे यांच्या नेतृत्वात आज शिवसेना जिल्हाप्रमुखांची बैठक आयोजित करण्यात आली होती, या बैठकीला सर्व जिल्हा प्रमुखांनी हजेरी लावली होती.

आम्हाला पुन्हा उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असा सूर या बैठकीत उमटल्याची माहिती रायगड उपजिल्हाप्रमुख अवचित राऊत यांनी दिली.

शिंदे यांनी ४० आमदारांसह बंड केल्यानंतर शिवसेनेत फूट पडल्याचे दिसत आहे.अद्यापही शिवसेनेत गळती सुरूच आहे. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी माजी आमदार, जिल्हाप्रमुख अशा पदाधिकाऱ्यांच्या बैठकांचा धडाकाच लावला आहे. शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या आज झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे यांच्या मागे आम्ही खंबीरपणे उभे आहोत, असे पदाधिकारी म्हणाले आहेत.

जे लालसेपोटी, आमिषाला बळी पडून गेले आहेत, त्यांच्यामुळे शिवसेना संघटनेला कोणताही धक्का बसणार नाही. त्यांच्या जागी नवीन नियुक्ती झाल्या आहेत. शिवसेनेत वर्षानुवर्षे जे काम करत आहेत, त्यांना संधी मिळाली आहे. जे गेले आहेत, त्यांच्यापेक्षा अधिक जोशाने काम करुन विधानसभेवर भगवा फडकवणार, असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी बैठकीत व्यक्त केला. तसेच शिवसेना आणि धनुष्यबाण हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, त्याला कोणीही वेगळे करू शकत नाहीत. यातच शिवसैनिक उद्धव ठाकरेंच्या बाजूने आहे. सहा महिन्यानंतर पण निवडणूक लागल्या तरी चालेल. आम्हाला उद्धव ठाकरे यांच्या रुपातच मुख्यमंत्री बघायला आवडेल, असा सूरही या बैठकीत उमटला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here