Gold Chain Theft Case : सोनसाखळी चोरी प्रकरणी दोन आरोपी ताब्यात

0
11

सोन्याचा मुद्देमालही हस्तगत, एमआयडीसी पोलिसांची कारवाई

साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  

शहरातील एमआयडीसी परिसरातील अयोध्या नगर भागात महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून पळणाऱ्या दुचाकीस्वारांच्या टोळीचा पर्दाफाश एमआयडीसी पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत केला आहे. गुप्त माहितीच्या आधारे रचलेल्या सापळ्यातून दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून चोरीस गेलेल्या सोन्याचा मुद्देमालही पोलिसांनी हस्तगत केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, १६ नोव्हेंबर २०२५ रोजी अयोध्या नगरातील एक महिला दुचाकीने घरी पोहोचत असताना मागून आलेल्या दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी जबरदस्तीने खेचून पोबारा केला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते. याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर गुप्त बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी माहिती गोळा करून आरोपींची ओळख पटवली. १८ नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागात सापळा रचून पोलिसांनी एक संशयिताला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने आपले नाव तेजस अनिल ईखनकर (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) असे सांगितले आणि गुन्ह्याची कबुलीही दिली. त्याने चोरीत आपला साथीदार प्रसाद उर्फ परेश संजय महाजन (रा. ज्ञानदेव नगर, जळगाव) सहभागी असल्याचेही सांगितले. विशेष म्हणजे, प्रसाद उर्फ परेश हा शनिपेठ पोलिस स्टेशन हद्दीत झालेल्या खुनाच्या गुन्ह्यापासून फरार होता. यादरम्यान पोलिसांनी १९ नोव्हेंबर रोजी माऊली नगर भागातून प्रसाद उर्फ परेश संजय महाजन यालाही ताब्यात घेतले. दोघांकडून चोरी केलेल्या मालामधून ८ ग्रॅम वजनाची, किंमत अंदाजे ८० हजार रुपये असलेली सोन्याची लगड पोलिसांनी हस्तगत केली आहे. कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे.

ही संपूर्ण कारवाई एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. तपास पथकात पोलीस उपनिरीक्षक राहुल ताडे, चंद्रकांत के., सहाय्यक फौजदार विजयसिंग पाटील, पो.ह. प्रदीप चौधरी, गिरीश पाटील, प्रमोद लाडवंजारी, किरण पाटील ठाकूर, पो.कॉ. किरण पाटील, शशिकांत मराठी, चेतन पाटील यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाईसाठी डॉ. महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक), अशोक नखाते (अपर पोलीस अधीक्षक), नितीन गणापुरे (उपविभागीय पोलीस अधिकारी) यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here