साईमत न्यूज नेटवर्क –
पुणे : मतदार यादीतील दुरुस्ती आणि एसआयआर फॉर्मच्या नावाखाली सायबर चोरट्यांनी कर्वेनगर परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकाची तब्बल ४ लाख ४३ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘फॉर्ममध्ये चूक झाली असून दुरुस्ती करण्यासाठी शुल्क भरावे लागेल’, असे सांगून चोरट्यांनी नागरिकाला जाळ्यात ओढले. त्यानंतर बनावट फॉर्म आणि एपीके फाइल पाठवून मोबाइलचा ताबा मिळवत बँक खात्यातील रक्कम परस्पर वळवण्यात आली. याप्रकरणी अलंकार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे खासगी कंपनीतून निवृत्त झाले असून कर्वेनगर येथील नवसह्याद्री सोसायटीत वास्तव्यास आहेत. ३० जुलै रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. मतदार यादी दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगत, तक्रारदारांनी भरलेल्या एसआयआर अर्जात काही त्रुटी असल्याची बतावणी करण्यात आली.
यानंतर चोरट्यांनी सामाजिक माध्यमांवर तयार केलेला बनावट फॉर्म तक्रारदारांना पाठवला. हा फॉर्म दुरुस्त करण्यासाठी केवळ पाच रुपये शुल्क भरावे लागेल, असे सांगण्यात आले. त्यासाठी चोरट्यांनी एक एपीके फाइल पाठवली आणि त्यामध्ये बँक खात्याशी संबंधित माहिती भरावी लागेल, असे सांगितले.
चोरट्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी दिलेल्या सूचनेनुसार आवश्यक माहिती भरली. त्यानंतर सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलचा ताबा मिळवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातून समोर आले आहे. काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून तब्बल ४ लाख ४३ हजार रुपये परस्पर काढण्यात आले. ही रक्कम पुढे अन्य बँक खात्यातही वळवण्यात आल्याचे समोर आले आहे.
खात्यातून मोठी रक्कम वजा झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदारांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यांनी तातडीने अलंकार पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
पोलिसांकडून या प्रकरणाचा तांत्रिक तपास करण्यात येत असून, फसवणुकीची रक्कम ज्या बँक खात्यांमध्ये वळवण्यात आली, त्यांची माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच फसवणुकीमागील आरोपींचा शोध घेण्यासाठी संबंधित मोबाइल क्रमांक, बँक व्यवहार आणि अन्य डिजिटल पुराव्यांची पडताळणी केली जात आहे.
दरम्यान, मतदार यादी, एसआयआर फॉर्म किंवा शासकीय प्रक्रियेच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींनी मोबाइलवर संपर्क साधून कोणतीही वैयक्तिक किंवा बँक खात्याची माहिती मागितल्यास ती देऊ नये. अनोळखी व्यक्तींनी पाठवलेल्या एपीके फाइल किंवा संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
