रात्रीच्या वेळी पुलाच्या कठड्यावर बिबट्या दिसल्याने वनविभाग व प्रशासनाने तातडीने पाहणी करण्याची मागणी
साईमत /भुसावळ / प्रतिनिधी
वरणगाव येथील आयुध निर्माणी कर्मचारी वसाहतीत शनिवारी (दि. ८) रात्री साडेनऊच्या सुमारास बिबट्याचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिक व कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वसाहतीतील क्वॉर्टर क्रमांक ३, टाईप-२ परिसराकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या पुलाच्या कठड्यावर बिबट्या बसलेला दिसून आला. या घटनेचे छायाचित्र कर्मचारी प्रविण चौधरी यांनी आपल्या मोबाईलमध्ये टिपले असून, त्यानंतर परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रविण चौधरी हे शनिवारी रात्री कुटुंबासह श्री सप्तशृंगी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. दर्शन आटोपून कारने कर्मचारी वसाहतीतील क्वॉर्टर क्रमांक ३, टाईप-२ परिसराकडे परतत असताना पुलाजवळ वाहनाच्या प्रकाशात त्यांना अचानक बिबट्या दिसला. पुलाच्या कठड्यावर काही वेळ बिबट्या स्पष्टपणे दिसत असल्याने चौधरी यांनी प्रसंगावधान राखत त्याचे छायाचित्र मोबाईलमध्ये टिपले. बिबट्याचे दर्शन होताच त्यांनी परिसरातील नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे.
विशेषतः क्वॉर्टर क्रमांक ३, टाईप-२ परिसरात रात्रीच्या वेळी विनाकारण फिरणे टाळावे, तसेच लहान मुलांना घराबाहेर एकट्याने पाठवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. वसाहतीत मोठ्या संख्येने कुटुंबे वास्तव्यास असून, सायंकाळनंतर नागरिकांची ये-जा सुरू असते. त्यामुळे बिबट्याचा वावर नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने चिंतेचा विषय ठरला आहे.
रिकाम्या क्वॉर्टर्सभोवती दाट झाडी
आयुध निर्माणी वरणगाव प्रशासनाने पूर्वी कर्मचाऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणात निवासस्थाने उभारली होती. मात्र, कालांतराने कर्मचारी संख्या कमी झाल्याने वसाहतीतील अनेक क्वॉर्टर्स सध्या रिक्त आहेत. या रिक्त घरांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात झाडे, झुडपे आणि काटेरी वनस्पती वाढल्या आहेत. परिणामी वसाहतीतील काही भाग निर्मनुष्य तसेच दाट झाडीने व्यापलेला आहे.
दाट झाडी व वाढलेल्या झुडपांमुळे वन्यप्राण्यांना लपण्यासाठी सुरक्षित जागा उपलब्ध होत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे बिबट्याचा वावर नेमका कोणत्या भागात आहे, याबाबत नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. वसाहतीच्या परिसरातील झाडाझुडपांची नियमित साफसफाई करून मोकळा परिसर निर्माण करण्याची आवश्यकता यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे.
अनेक महिन्यांपासून वावर असल्याचा कर्मचाऱ्यांचा दावा
वरणगाव फॅक्टरी वसाहतीत गेल्या काही महिन्यांपासून बिबट्याचा वावर असल्याचे काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. यापूर्वीही परिसरात बिबट्याच्या हालचाली जाणवल्याचे तसेच काही ठिकाणी त्याच्या अस्तित्वाच्या खुणा आढळल्याचे कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, शनिवारी रात्री बिबट्या थेट पुलाच्या कठड्यावर दिसून आल्याने त्याच्या वावराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वसाहतीत महिला, लहान मुले तसेच ज्येष्ठ नागरिकांसह अनेक कुटुंबे वास्तव्यास आहेत. सायंकाळनंतर आणि रात्रीच्या वेळी नागरिकांची घराबाहेर ये-जा सुरू असते. अशा परिस्थितीत बिबट्याचा वावर कायम राहिल्यास अनुचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रशासनाने या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी होत आहे.
वनविभागाने पाहणी करून उपाययोजना कराव्यात
बिबट्याचे दर्शन झाल्याच्या पार्श्वभूमीवर आयुध निर्माणी वरणगाव प्रशासनाने संबंधित वनविभागाशी तातडीने संपर्क साधून वसाहतीची पाहणी करावी, अशी मागणी नागरिक व कर्मचाऱ्यांकडून होत आहे. बिबट्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना करावी, तसेच नागरिकांना सुरक्षिततेबाबत स्पष्ट सूचना द्याव्यात, अशीही मागणी आहे.
वसाहतीतील रिक्त क्वॉर्टर्सच्या परिसरात वाढलेली झाडे-झुडपे आणि काटेरी वनस्पती तातडीने हटविण्यात याव्यात. तसेच बिबट्याचा वावर असलेल्या संभाव्य भागाची पाहणी करून नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
