फेसबुक पोस्टवरून मंत्री गिरीश महाजनांची बदनामी बीडमधील तरुणावर पोलिसांची कारवाई
साईमत /जळगाव /प्रतिनिधी
सोशल मीडियाचा गैरवापर करून राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणावर जळगाव सायबर पोलिसांनी प्रभावी कारवाई केली आहे. फेसबुकवर आक्षेपार्ह छायाचित्रासह दिशाभूल करणारा मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी बीड जिल्ह्यातील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तपास पूर्णत्वास येत असून लवकरच न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणी जळगाव महापालिकेचे नगरसेवक अरविंद भगवान देशमुख यांनी १९ जून २०२६ रोजी सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीत नमूद केल्यानुसार, “भारत बालाजी म्हस्के” या नावाने चालविल्या जाणाऱ्या फेसबुक खात्यावरून मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत एका तरुणीचे छायाचित्र पोस्ट करण्यात आले होते. या छायाचित्रासोबत जोडलेला मजकूर दिशाभूल करणारा व बदनामीकारक असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानुसार सायबर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली.
पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावीत आणि सायबर पोलीस निरीक्षक प्रदीप वाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाने डिजिटल पुराव्यांचे बारकाईने विश्लेषण केले. फेसबुक खात्याचा वापर, आयपी तपशील, तांत्रिक माहिती आणि इतर इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारे संशयिताची ओळख निश्चित करण्यात आली.
तपासादरम्यान बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील भारत बालाजी म्हस्के (वय ३४) हा आरोपी पुणे जिल्ह्यातील इंदापूर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर सायबर पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. चौकशीत आरोपीने संबंधित फेसबुक पोस्ट आपणच केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सुमारे ३० हजार रुपये किमतीचा ओप्पो रेनो १५ फाइव्ह-जी मोबाईल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी आरोपीला भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (बीएनएसएस) कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावली असून, तपास पूर्ण झाल्यानंतर न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
या प्रकरणात आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे, सायबर पोलिसांच्या पाठपुराव्यानंतर फेसबुक प्रशासनाने संबंधित आक्षेपार्ह पोस्ट तातडीने हटविली. तसेच जवळपास सहा हजार फॉलोअर्स असलेले संबंधित फेसबुक खाते कायमस्वरूपी निलंबित करण्यात आले आहे.
सायबर पोलिसांनी नागरिकांना सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे आवाहन केले आहे. कोणत्याही व्यक्तीची बदनामी होईल, समाजात गैरसमज निर्माण होतील किंवा खोटी माहिती पसरविली जाईल, अशा प्रकारचे मजकूर, छायाचित्रे किंवा व्हिडिओ प्रसारित करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.
