एकाच रात्री तीन घरांवर तुटून पडले चोरटे सव्वा लाखांची चोरी नागरिकांमध्ये भीती
साईमत /कजगाव, ता. भडगाव /प्रतिनिधी
भडगाव तालुक्यातील कजगाव येथे चोरट्यांनी मध्यरात्री धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन घरांना लक्ष्य केले. सी.टी. पाटील नगर कॉलनी परिसरात झालेल्या या धाडसी घरफोड्यांमध्ये रोकड, सोने व चांदीचे दागिने असा सुमारे एक ते सव्वा लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्रीनंतर पहाटे सुमारे ३ वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रथम फारूक हाजी सलीम खाटीक यांच्या घराला लक्ष्य केले. घरात प्रवेश करून चोरट्यांनी कपाटातील सुमारे ३० ते ३५ हजार रुपयांची रोकड तसेच अंदाजे दोन ग्रॅम सोन्याचे दागिने चोरून नेले.
त्यानंतर चोरट्यांनी याच परिसरातील भैय्या एकनाथ मिस्त्री (फौजी) यांच्या बंद घराचे कुलूप तोडले. घरातील साहित्य अस्ताव्यस्त करून त्यांनी ऐवजाचा शोध घेतला; मात्र त्यांच्या हाती काहीही लागले नाही. त्यामुळे चोरट्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले.
यानंतर चोरट्यांनी राकेश नटराज पाटील यांच्या घराकडे मोर्चा वळवला. सेफ्टी गेटची कडी कटरच्या साहाय्याने तोडून त्यांनी घरात प्रवेश केला आणि घरातील सुमारे अर्धा किलो वजनाचे चांदीचे दागिने लंपास करून पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच भडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल दत्तू पाटील, कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील तसेच भोरटेकच्या पोलीस पाटील रेश्मा जाधव यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. पोलिसांकडून चोरीचा तपास सुरू असून चोरट्यांचा माग काढण्यासाठी परिसरातील नागरिकांकडून माहिती घेतली जात आहे.
दरम्यान, कजगाव परिसरात यापूर्वीही चोरीच्या घटना घडल्या असल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. भडगाव तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असलेल्या कजगाव येथे कायमस्वरूपी पोलीस बंदोबस्त वाढविण्यात यावा, पोलीस मदत केंद्रावर दोन हवालदार व चार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी तसेच रात्रीची गस्त नियमित करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या घटनेनंतर चोरीग्रस्त कुटुंबीय आणि परिसरातील नागरिक तक्रार दाखल करण्यासाठी कजगाव येथील पोलीस मदत केंद्रावर गेले होते. मात्र मदत केंद्रावर कोणताही पोलीस कर्मचारी उपस्थित नसल्याने त्यांना माघारी फिरावे लागले. या प्रकारामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस मदत केंद्राच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
एकाच रात्री तीन ठिकाणी झालेल्या घरफोड्यांमुळे कजगाव परिसरात चोरट्यांची वाढती धाडसगिरी समोर आली असून नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
