शासकीय कार्यालयांत झळकणार अजितदादांची प्रतिमा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा पुढाकार
साईमत /अमळनेर /प्रतिनिधी
लोकनेते स्वर्गीय अजित अनंतराव (अजितदादा) पवार यांच्या जयंतीनिमित्त अमळनेर शहरात राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. अजितदादांच्या कार्याची आठवण कायम राहावी आणि शासनाच्या निर्णयानुसार विविध कार्यालयांमध्ये त्यांची जयंती सन्मानपूर्वक साजरी करता यावी, या उद्देशाने शहरातील शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांना त्यांच्या प्रतिमेच्या आकर्षक फोटो फ्रेम भेट देण्यात आल्या.
महाराष्ट्र शासनाने २०२६ पासून दरवर्षी २२ जुलै रोजी स्व. अजितदादा पवार यांची जयंती शासकीय व निमशासकीय कार्यालयांमध्ये साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी, तसेच कार्यालयांमध्ये अजितदादांची प्रतिमा उपलब्ध असावी, या हेतूने राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने हा उपक्रम हाती घेतला.
राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे नवनिर्वाचित शहराध्यक्ष मनीष पाटील, तालुकाध्यक्ष प्रणव चौधरी आणि कार्याध्यक्ष हुजैफा पठाण यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी अजितदादा पवार यांच्या राजकीय आणि सामाजिक प्रवासाचा गौरव करत त्यांच्या विकासाभिमुख विचारांची माहिती दिली.
राज्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे नेतृत्व म्हणून अजितदादांनी प्रशासन, शेती, शिक्षण आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात केलेले योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन युवकांनी समाजहितासाठी पुढे यावे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर कार्याध्यक्ष गोविंदा बाविस्कर, प्रदेश सचिव सुनील शिंपी, सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष दुर्गेश पाटील, भूषण लोहार, चैतन्य संदानशिव, कृष्णा पाटील, करण साळुंखे, ज्ञानदीप सांगोरे यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या उपक्रमामुळे शहरातील विविध कार्यालये आणि महाविद्यालयांमध्ये स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आवश्यक व्यवस्था उपलब्ध झाली असून, संघटनेच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात आले. अजितदादांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
