आर्थिक वादातून टोकाचे पाऊल; “माझ्यानंतर कुटुंबाची जबाबदारी संबंधित डॉक्टरावरच”, पाचोरा पोलीस ठाण्यात नातेवाईकांची प्रचंड गर्दी, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
साईमत -पाचोरा -प्रतिनिधी |
जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा रेल्वे स्थानकाजवळ संभाजीनगर येथील रहिवासी रवींद्र महाजन नावाच्या तरुणाने रेल्वेखाली धावून आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, आत्महत्या करण्यापूर्वी या तरुणाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल केला असून, त्यात एका डॉक्टरासोबतच्या आर्थिक व्यवहाराचा खळबळजनक खुलासा केला आहे. या घटनेमुळे पाचोरा आणि संभाजीनगर परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
…आणि डॉक्टरावर केला चाकूने हल्ला!
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, मयत रवींद्र महाजन यांचा डॉक्टर समाधान पाटील यांच्यासोबत आर्थिक व्यवहारावरून वाद सुरू होता. या वादाचा राग मनात धरून महाजन यांनी आधी डॉक्टर समाधान पाटील यांच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला, ज्यामध्ये डॉक्टरांच्या हाताला गंभीर दुखापत झाली. या हल्ल्यानंतर रवींद्र महाजन यांनी नगरदेवळा रेल्वे स्थानक गाठले आणि तेथे आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.
मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओतील ३ मोठे खुलासे:
”मी डॉक्टरांना बिनव्याजी पैसे दिले होते”: रवींद्र यांनी व्हिडिओत म्हटले आहे की, त्यांनी संबंधित डॉक्टरांना विश्वासाने बिनव्याजी पैसे दिले होते. मात्र, ते पैसे परत देण्यास डॉक्टरांनी स्पष्ट नकार दिला.
”त्याला मारण्याचा प्रयत्न केला, पण तो वाचला”: पैसे बुडवल्याच्या रागातून डॉक्टरांना मारण्याचा प्रयत्न केला, मात्र ते या हल्ल्यातून वाचले, अशी कबुलीही त्यांनी व्हिडिओत दिली.
”शासनाने मला न्याय द्यावा”: “माझ्यानंतर माझ्या संपूर्ण खानदानाची (कुटुंबाची) जबाबदारी आता त्याच डॉक्टरावर राहील. शासनाने माझ्या कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा,” अशी आर्त हाक त्यांनी मृत्यूपूर्वी लावली.
नातेवाईकांचा पोलीस ठाण्यात ठिय्या; गुन्हा दाखल करण्याची मागणी
रवींद्र महाजन यांच्या आत्महत्येची बातमी आणि सोशल मीडियावरील तो व्हिडिओ समोर येताच त्यांच्या नातेवाईकांनी आणि समाजबांधवांनी पाचोरा पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी केली. व्हिडिओमध्ये केलेल्या गंभीर आरोपांच्या आधारे संबंधित डॉक्टर समाधान पाटील यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी नातेवाईकांनी लावून धरली आहे. परिस्थितीचे गांभीर्य पाहून पोलीस ठाणे परिसरात मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
या प्रकरणी पाचोरा पोलिसांकडून गुन्हा नोंदविण्याची कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेला तो व्हिडिओ आणि डॉक्टरांवर झालेला हल्ला या दोन्ही बाबी लक्षात घेऊन पोलीस सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत. तपासाअंती दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
