टायर फुटल्याने दुर्घटना; गुजरातहून हैदराबादला चालला होता रिफाइंड तेलाचा ट्रक
साईमत -जळगाव- प्रतिनिधी |नागपूर महामार्गावर आज एक अत्यंत थरारक आणि भीषण दुर्घटना घडली. गुजरात येथून रिफाइंड तेल आणि ऑइल पावडर घेऊन हैदराबादच्या दिशेने जाणाऱ्या एका धावत्या ट्रकला अचानक भीषण आग लागली. ट्रकचा टायर फुटल्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. या आगीत ट्रकचे प्रचंड नुकसान झाले असून, महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती.
काळ आला होता, पण वेळ आली नव्हती!
हा ट्रक महामार्गावरून वेगात जात असताना अचानक मोठा आवाज होऊन ट्रकचा टायर फुटला. त्यानंतर काही क्षणांतच ट्रकमधून मोठ्या प्रमाणात धूर निघू लागला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि कमालीचे प्रसंगावधान राखत ट्रक चालक गौतम कुमार आणि क्लीनर यांनी थेट धावत्या ट्रकमधून खाली उड्या मारल्या. दोघांनी वेळीच घेतलेल्या या निर्णयामुळे त्यांचे प्राण बालंबाल बचावले. मात्र, काही मिनिटांतच आगीने रौद्ररूप धारण केले आणि संपूर्ण ट्रक आगीच्या भक्ष्यस्थानी पडला.
ट्रकने पेट घेतल्यानंतर ऑइल आणि इतर साहित्यामुळे आग वेगाने पसरली. यामुळे महामार्गावर दोन्ही बाजूने वाहतूक थांबवण्यात आली, ज्यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशामक दलाची यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाली. अग्निशामक दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. यानंतर हायवेवरील वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.
”प्रवास सुरू असताना अचानक टायर फुटल्याचा आवाज आला आणि पुढच्याच सेकंदाला केबिनच्या बाजूने धूर निघू लागला. आग वेगाने पसरत होती. आम्ही क्षणाचाही विचार न करता चालत्या गाड्यातून उड्या मारल्या. डोळ्यांदेखत संपूर्ण गाडी जळून खाक झाली, पण सुदैवाने आमचा जीव वाचला.”
– गौतम कुमार, ट्रक चालक
या भीषण आगीत ट्रकमधील लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाल्याची माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचा अधिकृत तपास पोलीस करत आहेत.
