मुंबई/जालना:
अन्न आणि औषध प्रशासन (FDA) विभागाचा पदभार स्वीकारल्यापासून भेसळखोरांविरोधात धडक मोहीम उघडणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या कामाचे राज्यभरातून प्रचंड कौतुक होत आहे. मात्र, त्यांच्या या धडक कारवाया सुरू असतानाच राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा त्यांच्या बदलीची कुजबुज सुरू झाली आहे. यावर आता मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील अत्यंत आक्रमक झाले असून, त्यांनी “सरकारने मुंढेंच्या बदलीच्या भानगडीत पडूच नये, अन्यथा परिणाम भोगावे लागतील,” असा थेट इशारा शिंदे-फडणवीस-पवार सरकारला दिला आहे.
तुकाराम मुंढेंचा धडाका; ‘मकोका’च्या इशाऱ्याने भेसळखोर गारद
आपल्या कडक आणि पारदर्शक कार्यशैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या तुकाराम मुंढे यांची शासकीय सेवेत आतापर्यंत तब्बल २५ वेळा बदली झाली आहे. नवीन विभागात आल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यांनी कोट्यवधी रुपयांचा संशयित भेसळीचा साठा जप्त केला. अन्नपदार्थांत भेसळ करणाऱ्यांवर थेट ‘मकोका’ (MCOCA) अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिल्यामुळे राज्यातील अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. सर्वसामान्य जनतेकडून मुंढेंच्या या भूमिकेचे जोरदार स्वागत केले जात आहे.
’त्या भानगडीत पडूच नये’; जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
तुकाराम मुंढेंच्या संभाव्य बदलीच्या चर्चेवर बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला स्पष्ट शब्दांत सुनावले.
”तुकाराम मुंढे हे जनहिताचे काम करत आहेत. त्यांच्या कारवाईमुळे सर्वसामान्यांच्या आरोग्याचे रक्षण होत आहे. अन्नपदार्थांमधील भेसळ रोखल्यास नागरिकांना फायदा होईल आणि दुधातील भेसळ थांबल्यास शेतकऱ्यांच्या शुद्ध दुधाला योग्य भाव मिळेल. त्यामुळे सरकारने त्यांच्या कामात अजिबात अडथळे आणू नयेत. सरकारने त्यांच्या बदलीच्या भानगडीत पडूच नये, अन्यथा आम्ही सरकारच्या विरोधात तीव्र भूमिका घेऊ.”
— मनोज जरांगे पाटील
यावेळी बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाचाही उल्लेख केला. शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर रोहित पवार आंदोलन करत असल्याने आपण त्यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले; मात्र या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. याच सोबतीने, राज्यातील शेतकऱ्यांची केवळ कर्जमाफी नाही, तर सरकारने त्यांना संपूर्ण ‘कर्जमुक्ती’ दिली पाहिजे, अशी आग्रही मागणीही त्यांनी केली.
