मुंबई/जळगाव:
पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षामध्ये झालेल्या मोठ्या बंडखोरीचे पडसाद आता महाराष्ट्राच्या राजकारणात उमटू लागले आहेत. शिवसेनेचे (शिंदे गट) नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “ममतादीदींचे खासदार फुटलेच ना, ज्याला जायचे तो जातोच,” असे सूचक विधान करत गुलाबराव पाटील यांनी ठाकरे गटातील संभाव्य फुटीच्या चर्चांना हवा दिली आहे.
उद्धव ठाकरे यांनी अचानक बोलावलेली आपल्या खासदारांची तातडीची बैठक आणि ठाकरे गटाचे काही खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या संपर्कात असल्याच्या चर्चा या पार्श्वभूमीवर पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही प्रतिक्रिया दिली.
’ऑपरेशन टायगर’वर गुलाबराव पाटलांचे मोठे वक्तव्य
ठाकरे गटाच्या खासदारांना शिंदे गटात आणण्यासाठी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू असल्याच्या चर्चांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “बैठक घेणे हे प्रत्येक पक्षाच्या नेत्याचे काम आहे. ऑपरेशन टायगर वगैरे आमचे काहीच नाही. आमच्या शिवसेनेत या, असे आम्ही कोणालाही सांगायला जात नाही. मात्र, लोक इकडून तिकडे का जात आहेत? याचा विचार आणि अभ्यास संबंधित नेत्यांनी करण्याची गरज आहे.”
पुढे बोलताना त्यांनी थेट पश्चिम बंगालचा दाखला दिला. “तुम्ही कितीही रोखण्याचा प्रयत्न करा, आता टीएमसीच्या खासदारांना रोखण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र ते फुटलेच ना? त्यामुळे ज्याला जायचे आहे तो जातोच,” असा थेट टोला त्यांनी उद्धव ठाकरेंना लगावला.
विरोधक गिरीश महाजनांच्या संपर्कात?
महायुतीच्या आगामी रणनीतीवर बोलताना पाटील म्हणाले की, एकनाथ शिंदे यांच्या आदेशानंतर महायुतीचा उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत. महाविकास आघाडीचे काही उमेदवार आणि अपक्ष उमेदवार हे भाजप नेते गिरीश महाजन यांच्या संपर्कात असल्याचा दावाही त्यांनी यावेळी केला. “माघार झाली असली तरी पुढील दौऱ्यांचे नियोजन करण्यासाठी बैठका घ्याव्याच लागतील. मत देणारा मतदार राजा शहरात आणि गावात बसलेला आहे, त्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहचावेच लागेल,” असेही ते म्हणाले.
राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण
पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या २० खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन केल्यानंतर, आता महाराष्ट्रातही तशीच पुनरावृत्ती होणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उद्धव ठाकरेंनी बोलावलेली तातडीची बैठक ही आपल्या खासदारांना रोखण्यासाठीचा ‘डॅमेज कंट्रोल’चा भाग असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
