घराच्या अंगणात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली वाढदिवसाच्या आनंदावर अवघ्या पाच दिवसांत शोककळा
साईमत /नशिराबाद /प्रतिनिधी
भवानीनगर परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. घराच्या पाठीमागे साचलेल्या पावसाच्या पाण्याच्या हौदात बुडून तीन वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली असून, अवघ्या पाच दिवसांपूर्वीच साजऱ्या झालेल्या तिच्या वाढदिवसाच्या आनंदावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कुमारी आकांक्षा प्रवीण (आबा) इंगळे (वय ३ वर्षे) असे या चिमुकलीचे नाव आहे. ती घराच्या अंगणात खेळत असताना ही दुर्दैवी घटना घडली. घटनेच्या वेळी कुटुंबीय घरात जेवणासाठी बसले होते. दरम्यान, खेळता खेळता आकांक्षा घराच्या मागील बाजूस गेली आणि तिथे पावसामुळे साचलेल्या पाण्याच्या हौदात पडली.
बराच वेळ ती दिसून न आल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. काही वेळानंतर ती पाण्याने भरलेल्या हौदात आढळून आली. तातडीने तिला बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले.
या घटनेची माहिती मिळताच बौद्ध पंच मंडळाचे अध्यक्ष विनोद रंधे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले तसेच पुढील आवश्यक कार्यवाहीसाठी सहकार्य केले.
विशेष म्हणजे, आकांक्षा इंगळे हिचा जन्म १ जुलै २०२३ रोजी झाला होता. याच वर्षी १ जुलै रोजी तिचा तिसरा वाढदिवस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला होता. मात्र, वाढदिवसाच्या आठवणी ताज्या असतानाच तिच्या अकाली निधनाने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.
ही दुर्घटना प्रत्येक पालकांसाठी एक गंभीर इशारा ठरत असून, पावसाळ्यात घराच्या परिसरात साचणाऱ्या पाण्याच्या हौद, टाक्या किंवा अशा धोकादायक ठिकाणी लहान मुलांच्या सुरक्षिततेकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
