“भाजप कार्यकर्ता ३६५ दिवस कार्यरत राहावा “352 बूथवर जयंती साजरी करण्याचे भाजपचे निर्देश”
साईमत/जळगाव/प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी जळगाव जिल्हा महानगरच्या वतीने आज दापोरेकर मंगल कार्यालय येथे शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांचे एक दिवसीय संमेलन उत्साहात पार पडले. हे संमेलन डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आले होते.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. मुखर्जी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पणाने करण्यात आली. या प्रसंगी आमदार सुरेश भोळे, प्रमुख वक्ते राजेंद्र नन्नवरे, भाजप जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, महापौर दिपमाला काळे, स्थायी सभापती डॉ. चंद्रशेखर पाटील, मनपा गटनेते प्रकाश बालाणी तसेच माजी जिल्हाध्यक्षा उज्वला बेंडाळे उपस्थित होते.
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना प्रमुख वक्ते राजेंद्र नन्नवरे यांनी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. त्यांनी काश्मीरसाठी दिलेला लढा, राष्ट्रभक्तीची भूमिका आणि त्यांच्या बलिदानाचा उल्लेख करत उपस्थितांना प्रेरित केले. त्यांनी सांगितले की, डॉ. मुखर्जी यांनी देशात राष्ट्रजागृतीची चेतना निर्माण केली. त्यांच्या बलिदानाला खरी श्रद्धांजली म्हणजे कलम 370 रद्द होणे होय, असे मतही त्यांनी व्यक्त केले. त्यांच्या भाषणानंतर सभागृहात “वंदे मातरम्”, “भारत माता की जय” आणि “डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी अमर रहे” अशा घोषणा घुमल्या.
यानंतर आमदार सुरेश भोळे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, प्रत्येक शक्ती केंद्र व बूथ प्रमुखांनी ६ जुलै रोजी जळगाव शहरातील ३५२ बूथवर डॉ. मुखर्जी यांची जयंती साजरी करावी. तसेच केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांची माहिती तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन त्यांनी केले. “भाजपचा कार्यकर्ता हा वर्षाचे ३६५ दिवस कार्यरत असतो,” असे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांना संघटनात्मक बांधिलकीची जाणीव करून दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांनी केले. सूत्रसंचालन अॅड. शुचिता हाडा यांनी केले, तर आभार प्रदर्शन चिटणीस भूषण लाडवंजारी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, भारती सोनवणे, राहुल वाघ, नितीन इंगळे, जयेश भावसार, महिला मोर्चा अध्यक्षा नितू परदेशी, सागर पाटील, मंडल अध्यक्ष आनंद सपकाळे, अजित राणे, विनोद मराठे, अतुल बारी आदींनी परिश्रम घेतले.हा संपूर्ण कार्यक्रम संघटनात्मक शिस्त, विचारप्रेरणा आणि कार्यकर्त्यांच्या सक्रियतेचा संदेश देणारा ठरला.
