साईमत न्यूज नेटवर्क –
नाशिक शहरातील मुंबई नाका परिसर येथे अमली पदार्थविरोधी पथकाने धडक कारवाई करत एमडी (मेफेड्रॉन) या अमली पदार्थाच्या विक्रीच्या तयारीत असलेल्या तिघांना अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ७ लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून त्यात एमडी ड्रग्ज, महागडे मोबाइल, रोकड आणि चारचाकी वाहनाचा समावेश आहे.
या प्रकरणी मुंबई नाका पोलिस ठाणे येथे एनडीपीएस कायदा १९८५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये झाकिर रफिक शेख (३८, जुने नाशिक), शाहरूख युसूफ शेख (३०) आणि सिराज सोहराय शेख (३१) यांचा समावेश आहे. शनिवारी पहाटे साडेदोन वाजेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
पोलिसांना शुक्रवारी सायंकाळी गोपनीय माहिती मिळाली होती की, मुंबई नाका परिसरातील गारवा बिर्याणी जवळ काही जण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी थांबले आहेत. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक अफरोज शेख यांच्या मार्गदर्शनाखाली अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत छापा टाकला. यावेळी आरोपी झाकिर शेख याच्याकडून सुमारे ८ ग्रॅम वजनाचा ४० हजार रुपये किमतीचा मेफेड्रॉन जप्त करण्यात आला.
तपासादरम्यान आरोपींकडून विविध कंपन्यांचे महागडे मोबाइल फोन, रोकड तसेच अंदाजे ५ लाख रुपये किमतीची सिल्व्हर रंगाची स्कोडा सेडान कार जप्त करण्यात आली. जप्त मोबाइलमध्ये आयफोन ११, मॉडिफाईड आयफोन, सॅमसंग गॅलेक्सी एफ-१५ आणि सॅमसंग गॅलेक्सी झेड फोल्ड-५ यांचा समावेश आहे. या मोबाइलच्या फॉरेन्सिक तपासातून अमली पदार्थ पुरवठा साखळीबाबत महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी हा अमली पदार्थ मालेगाव येथील हसन नावाच्या व्यक्तीकडून आणल्याची माहिती समोर आली आहे. या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, शहरात यापूर्वीही अशाच प्रकारे ड्रग्जची विक्री झाली होती का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पोलिस कोठडीतून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
